राज्यामधील करोनाग्रस्तांची संख्या ३७ वर पोहचली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. मुंबईमध्ये तीन तर नवी मुंबईमध्ये एक नवीन रुग्ण अढळून आल्याने रविवारी ३३ असणारी संख्या सोमवारी ३७ वर पोहचली आहे. याच पार्श्वभूमीवर सरकार आणखीन काही ठोस निर्णय घेण्यासंदर्भात संबंधित अधिकारी आणि मंत्र्यांशी चर्चा झाल्याची माहिती टोपे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. गर्दीने प्रवास केला जाणाऱ्या सार्वजनिक वाहतूक सेवांमधील प्रवाशी संख्या कमी करण्यासंदर्भातील चर्चाही झाल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये मुंबईतील बेस्ट तसेच लोकल ट्रेनमधील गर्दी कमी करण्यासंदर्भातील महत्वाचे निर्णय सरकारकडून घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली. “आपण बऱ्यापैकी शटडाऊन केलं आहे. मात्र इतरही काही निर्णय घेणं आवश्यक आहे. नुकतीच आरोग्य विभागाची बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये अनेक अधिकाऱ्यांनी शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये बंद करावीत आणि त्यांच्या परिक्षाही पुढे ढकलाव्यात असे मत नोंदवले आहे. सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये उभं राहून रेटारेटी करत जो प्रवास करणारी गर्दी असते ती कमी करण्यासंदर्भात निर्णय घेणं गरजेचे असल्याचीही चर्चा या बैठकीमध्ये झाली,” असं टोपे यांनी स्पष्ट केलं. ‘उभं राहून रेटारेटी करत प्रवास’ यावरुन आरोग्यमंत्र्यांनी लोकल ट्रेन वाहतुकीकडे इशारा केल्याचे समजते.

खासगी कंपन्यांसंदर्भातही मोठ्या निर्णयाची शक्यता

“खासगी कंपन्यांनाही बंद करण्यासंदर्भातील निर्णय घ्यावा अशा अनेक विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा झाल्या. तसेच आरोग्य विभागाला लागणाऱ्या आवश्यक बाबी उपलब्ध आहेत का, नवीन काही आदेश द्यावे लागतील का याचाही आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला. या बैठकीला आरोग्य विभागाचे सचिव, संचालक आणि राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर असे सर्वचजण उपस्थित होते. सर्व गोष्टींसाठी आरोग्य खाते तयार आहे. नवीन आदेश वेळोवेळी दिले जात आहेत,” अशी माहिती टोपे यांनी दिली.

राज्यामधील करोनाग्रस्तांची संख्या चारने वाढल्याची माहिती टोपे यांनी दिली. मात्र सर्व करोनाबाधितांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे. “राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे. नवीन रुग्ण हे करोनाग्रस्तांच्या कुटुंबातीलच व्यक्ती आहेत. करोनाग्रस्तांच्या थेट संपर्कात येणाऱ्या म्हणजेच हाय रिस्क कॉनटॅक्टमधील हे नवे रुग्ण आहेत. दोन जण थेट कुटुंबातील आहेत. तर दोघे परदेशातून प्रवास करुन आले आहेत,” अशी माहिती टोपे यांनी दिली. “विलगीकरण कक्षामध्ये लक्षणे असलेले किंवा परदेशात फिरुन आलेल्या लोकांना ठेवले जाते. पनवेलमध्ये अशा ३३ लोकांना ठेवण्यात आलं आहे,” असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.

Story img Loader