करोनामुळे देशातील नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालं आहे. करोनासंदर्भात जगभरातून येणाऱ्या बातम्या आणि दररोज उडणाऱ्या अफवा यामुळे लोकांचा गोंधळ उडत आहे. जगाबरोबर भारतातही करोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. ही संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. यापूर्वी अशाच एका रोगानं जगाला वेठीस धरलं होतं. साल होतं १८९८-९९. रोगाचं नाव होत प्लेग. प्लेगच्या साथीमुळे त्यावेळच्या मुंबई इलाख्यात जवळपास ९ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र, त्यावेळच्या कोल्हापूर संस्थानात या प्लेगला शिरता आलं नाही. त्यामागे होते छत्रपती राजर्षी शाहू महाराज.
सध्या जशी करोनाची साथ आली आहे. तशीच १८९८ साली जगामध्ये प्लेगची साथ आली होती. भारतातही प्लेग वाऱ्याच्या वेगासारखा पसरला. या प्लेगच्या प्रकोपात मुंबई आणि परिसरात ९ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. पुण्यातही मोठी जीवितहानी झाली. पण त्याचवेळच्या कोल्हापूर संस्थानात प्लेग भीती निर्माण करता आली नाही. कारण त्यावेळी कोल्हापूरच्या गादीवर होते छत्रपती राजर्षी शाहू महाराज. त्यावेळी राज्यकर्त्यांनी जनतेची काळजी कशी घ्यावी याचा आदर्शच शाहू महाराजांनी समोर ठेवला.
मुंबईत प्लेगची साथ पसरत असल्याची वृत्त येत असताना शाहू महाराजांनी संपूर्ण कोल्हापूर रिकामं केलं. त्यावेळी समाजावर अंधश्रद्धेचा प्रचंड पगडा होता. पण शाहू महाराजांनी रयतेला वैज्ञानिक माहिती देण्याच काम हाती घेतलं. लोकांना व्यवस्थित माहिती मिळावी यासाठी हजारो पत्रक छापली. ती वाटली. ज्यांना वाचता येत नाही, त्यांच्यासाठी गावागावात त्यांचं वाचन करण्यात आलं. त्यानंतर त्यांची कारणं पटवून देण्यात आली. गावांचं पुर्नवसन करून गाव स्वच्छ केलं. दवाखाने उभारले. इथपर्यंतच महाराज थांबले नाहीत. त्यांनी प्लेगवर औषध शोधण्यास सुरूवात केली. होमिओपॅथीमध्ये यावर असं औषध असल्याचं त्यांना कळालं. त्यानंतर देशातील पहिले सार्वजनिक होमिओपॅथी रुग्णालय कोल्हापुरात सुरू झालं.
महाराजांनी प्लेगच्या साथीचा मुकाबला करण्यासाठी केवळ प्रजेला कामाला लावलं नाही. तर ते स्वतः यात लक्ष घालत होते. लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी स्वतः छत्रपती शाहू महाराजांनी लस टोचून घेतली होती. त्यांनी केलेल्या तत्पर आणि तातडीच्या उपाययोजनांमुळे कोल्हापूर संस्थानात प्लेगच्या साथीला मनुष्यहानी करता आली नाही.