करोनाच्या पार्श्वभुमीवर सध्या राज्यात संचारबंदी लागू असल्याने ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून जीवनाश्यक वस्तू वगळता इतर सर्व वाहतूक रोखण्यात येत आहे. अशाच नाकाबंदीत पोलिसांनी हिंगोलीतील एका शेतकऱ्याचा ट्रक अडवला. ट्रकमधून हा शेतकरी शेतातील संत्री घेऊन चालला होता. पोलिसांनी ट्रक अडवल्याने शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेसेज केला आणि मदत मागितली. यानंतर जे काही घडलं त्यावरुन उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं जात आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील शेतकरी बाळू पाटील यांची संत्रीची फळबाग आहे. बाळू पाटील हे जवळाबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आहेत. बाळू पाटील यांना आपल्या शेतातील नऊ टन संत्री बंगळुरुला पाठवायचा होता. परंतू करोनामुळे जिल्ह्यांच्या सीमा सील असल्याने ट्रक अडवण्यात आला. पोलिसांच्या भीतीपोटी चालकानेही पळ काढला. यानंतर बाळू पाटील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच मेसेज केला आणि घडल्या प्रकाराची माहिती दिली.

आणखी वाचा- “कोणी विचारलं तर अजित पवारचा फोन आलता सांग”… क्लिप व्हायरल

महत्त्वाचं म्हणजे करोनामुळे सध्या व्यस्त असणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी तात्काळ या मेसेजची दखल घेतली. त्यांनी लगेच परभणीचे पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांना फोन केला आणि शेतकऱ्यांची अडवणूक करुन नका असं सांगत ट्रक सोडण्याचा आदेश दिला. यानंतर बाळू पाटील यांचा ट्रक बंगळुरुच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आला.

आणखी वाचा- पोलीसदेखील एक माणूस, त्यांच्यावर किती ताण देणार – जयंत पाटील

बाळू पाटील हे शिवसैनिक आहेत. पण त्यांनी आपल्या मेसेजमध्ये कुठेही आपण शिवसैनिक असल्याचा उल्लेख केला नव्हता. तरीही उद्धव ठाकरे यांनी तात्काल मदत केली याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या रुपाने आपल्याला देव भेटल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Story img Loader