मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर येथील व्यायामशाळा, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, जलतरण तलाव बंद राहणार असल्याचं सांगितलं आहे. करोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी लोकांनी अनावश्यक प्रवास आणि गर्दी टाळली पाहिजे असं आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलं. पुणे आणि पिंपरीमधील शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. आज मध्यरात्रीपासून सर्व निर्णय लागू केले जाणार आहेत. परीक्षा उशिरा घेण्यासंबंधी विचार केला जात आहे असं यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
“मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर येथील व्यायामशाळा, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, जलतरण तलाव बंद ठेवण्यात येणार असून मध्यरात्रीपासून या आदेशाची अमलबजावणी होणार आहे,” अशी माहिती यावेळी उद्धव ठाकरेंनी दिली. “मॉल्स, रेस्तराँ, हॉटेल आपण बंद करत नाही आहोत पण तिथे जाणं लोकांना टाळावं,” असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. “सुदैवाने अजून १७ ही लोकांमध्ये गंभीर लक्षणं दिसत नाही आहेत. आपण दक्षता घेतली तर पुढील धोका टाळू शकतो,” असं यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
“सुदैवाने आपल्या येथून उत्पत्ती झालेली नाही. त्यामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा वगळता पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. उगाच भीतीचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी मुंबईत असा निर्णय घेण्यात आलेला नाही. खासगी शाळा काही ठिकाणी स्वत:हून बंद करत आहेत. लोकांच्या मनात भीती निर्माण होऊ नये ही आपली जबाबदारी आहे,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
“रेल्वे आणि बस अत्यावश्यक सेवा असल्याने बंद करु शकत नाही. तसंच धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय तसंच क्रीडा स्पर्धा घेण्यात येऊ नयेत. अशा कार्यक्रमांसाठी सरकारकडून परवानगी दिली जाणार नाही. परवानगी दिली असेल तर ती रद्द केली जाईल. खासगी कंपन्यांना शक्य आहे तिथे सर्व कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची परवानगी द्यावी,” असं उद्वव ठाकरेंनी सांगितलं.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “ज्या देशांची यादी केंद्र सरकारने दिली आहे त्यामध्ये अमेरिका आणि दुबईचा समावेश नव्हता. पण आपल्याकडे सापडलेले रुग्ण तेथून आलेले आहेत. त्यामुळे आपण केंद्र सरकारच्या निदर्शनास ही बाब आणून देणार आहोत”. करोना व्हायरसच्या रुग्णांसाठी मुंबई, पुणे आणि नागपूर विमानतळावर व्यवस्था करण्यात आली असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.