संपूर्ण देशात व महाराष्ट्रात करोना विषाणू संसर्गाचा धोका वाढत असताना सोलापुरात करोना विषाणूची बाधा झालेला एकही रूग्ण सुदैवाने आढळून आला नसला तरी त्याबाबत गांभीर्याने सावधानता बाळगण्यात सोलापूरकर कमालीचे उदासीन आहेत. करोना विषाणूला अटकाव होण्यासाठी पुकारलेल्या संचारबंदीचा अंमल प्रभावीपणे होण्यासाठी नागरिकांची अपेक्षित साथ मिळत नाही. सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी सकाळी चार-पाच तासांपर्यंत शेतकरी व नागरिकांची उडालेली झुंबड आणि त्यातून अवघ्या परिसराला आलेले जत्रेचे स्वरूप हे उदासीनतेचे ठळक उदाहरण समजले जाते.
करोना विषाणूचा विळखा देशभरासह महाराष्ट्राला बसून धोका अधिक वाढत आहे. सोलापूर भागात करोना विषाणूची बाधा झालेला एकही रूग्ण आढळून आला नसला तरी शेजारच्या पुण्यासह सांगली, सातारा तसेच सोलापूरपासून जवळच असलेल्या कलबुर्गी (कर्नाटक) इत्यादी भागात करोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. विशेषतः पुण्याशी असलेला वाढता संपर्क सोलापूरसाठी अतिधोक्याची घंटा आहे. या पार्श्वभूमीवर रोजगार, नोकरी, व्यवसायासाठी पुणे व मुंबईत स्थायिक झालेले सोलापूरचे हजारो कुटुंबीय करोनाच्या भीतीने सोलापुरात परत येत आहेत.
नाक्यांवर प्रत्येकाची तपासणी होत असल्याचे सांगितले जात असले तरी मुंबई, पुण्याहून सोलापुरात येणारे लोंढे वाढतच आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण असतानाच दुसरीकडे सोलापुरात पुकारलेल्या संचारबंदीला नागरिकांची अपेक्षित व गांभीर्यपूर्वक साथ मिळत नसल्याचे चित्र दिसून येते. गेल्या रविवारी जनता संचारबंदीला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला होता. परंतु त्यानंतर गेल्या दोन दिवसांत प्रशासनाने अधिकृतपणे पुकारलेल्या संचारबंदीचे पालन करण्यात नागरिक बेफिकीर असल्यामुळे शेवटी पोलिसांना रस्त्यावर उतरून संचारबंदी म्हणजे काय असते, हे नागरिकांना दाखवून द्यावे लागत आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंगळवारी दाखल करण्यात येणाऱ्या खटल्याची संख्या ७८ एवढी होती. रस्त्यावर संचारबंदीचा आदेश तोडून रस्त्यावर मोकाट फिरणा-या तरूणांना पोलिसांकठून लाठीचा प्रसाद मिळत आहे. परंतु तरीही संचारबंदीतून जरब बसेल’ अशी ठोस कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.
विशेषतः सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या आवारात सकाळी बराच वेळ शेतीमाल आवक वाढली तशी गर्दीला उधाण आले होते. करोना विषाणूचा प्रादूर्भाव होईल आणि आपणांसही धोका होईल, याची कसलीही भीती कोणाला वाटत नव्हती. एवढ्या प्रचंड गर्दीत तोंडावर मास्क लावण्याची दक्षतादेखील घेतली जात नव्हती. जत्रासदृश्य गर्दीत पाय ठेवायलाही जागा नव्हती. शेवटी तेथे उशिरा का होईना’ पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
संचारबंदी पुकारताना त्यातून जीवनाश्यक सेवा वगळताना भाजी मंडईत एकाच ठिकाणी बसून भाजीपाला विकता येणार नाही. त्यापेक्षा रस्त्यावर फिरून भाजीपाला विकण्याचे बंधन घालण्यात आले आहे. परंतु दुपारी उशिरापर्यंत त्याचेही पालन होत नसल्याचे दिसून आले.