करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या असताना या प्रयत्नांना तेवढीच सकारात्मक साथ नागरिकांनी देणे अपेक्षित आहे. परंतु सोलापुरात त्याविषयीचे गांभीर्य न पाळता उलट अंधश्रध्देला खतपाणी घालण्याचे प्रकार घडत आहेत. करोनाचा नायनाट होण्यासाठी घरोघरी अंगणात दिवे लावले जात आहेत. तर काही ठिकाणी झाडांखालीही दिवे लावले जात आहेत.
शहराच्या पूर्व भागात तेलुगु भाषकांच्या वस्त्यांमध्ये घरोघरी अंगणात दिवे लावण्याची धडपड देवभोळ्या महिलांकडून होताना दिसून येत आहे. अशोक चौक, पाच्छा पेठ, हैद्राबाद रस्त्यावरील इंदिरा गांधी विडी घरकुलापासून ते अक्कलकोट रस्त्यावर कॉम्रेड गोदूताई परूळेकर विडी घरकुलापर्यंत त्याचे लोण पसरले आहे.
एखाद्या संकटासमयी घराच्या अंगणात दिवे लावण्याचा हा पहिलाच प्रकार नाही. तर यापूर्वीही एका अफवेतून असा प्रकार पूर्व भागात घडला होता. त्यानंतर आता करोना विषाणू फैलावाचे संकट आपल्या घरात येऊ नये म्हणून घराच्या अंगणात रांगोळी काढून दिवे लावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. तर काही भागात झाडांच्या खाली विशेषतः कडुनिंबाच्या झाडाखाली दिवे लावण्याचेही प्रकार घडत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.