राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत महापालिकेकडून ७६ एएनएम पदासाठी होणाऱ्या मुलाखतीदरम्यान प्रचंड गदारोळ झाला. अपात्र उमेदवारांची यादी लावली नाही. ३८० गुणानुक्रमे अधिक असणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी कसे बोलविले, असा जाब विचारत अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या इमारतीवर दगडफेक केली. सभागृहात संतप्त उमेदवार एकदम घुसल्याने गोंधळ उडाला. परिणामी, भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचे आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी जाहीर केले.
एएनएम पदाच्या ७६ जागांसाठी १ हजार ३६५जणांनी अर्ज दाखल केले होते. भरती नीट व्हावी, म्हणून बेगमपुरा पोलीस ठाण्याकडे बंदोबस्त मागण्यात आला होता. ६ महिला व ६ पुरुष पोलीस असतानाही उमेदवारांनी गोंधळ केला, असे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी जयश्री कुलकर्णी म्हणाल्या. अधिक पोलीस बंदोबस्त मिळावा, अशी विनंती त्यांनी महापालिका अधिकारी शिवाजी झणझण यांच्याकडे केली होती. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मंगळवारी दुपारपासून काहीजण भरती प्रक्रियेत हस्तक्षेप करीत होते.
बार्शी तालुक्यातील एका महिलेने पुढाकार घेऊन भरती प्रक्रिया कशी चुकीची आहे, हे उमेदवारांना सांगितले. १ हजार ३६५ उमेदवारांना एका जागेस पाच या प्रमाणे गुणवत्तेनुसार मुलाखतीसाठी बोलविले होते. मात्र, सर्व उमेदवारांच्या मुलाखती घ्याव्यात, या साठी काहीजण आग्रही होते. त्यातून हा गोंधळ झाला. पोलिसांनी संतप्त उमेदवारांवर हलकासा लाठीहल्लाही केला. त्यामुळे चिडलेल्या उमेदवारांनी संशोधन केंद्राच्या इमारतीवर दगडफेक केली.

Story img Loader