महापौरपदाच्या निवडणुकीला दोन दिवस राहिले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चार नगरसेवकांनी सचिन जाधव यांना मतदान करावे, असा पक्षादेश (व्हीप) त्यांच्या श्रेष्ठींकडून बजावण्यात अखेर शिवसेनेने यश मिळवले. मात्र त्याचा कितपत उपयोग होईल, याबाबत साशंकताच आहे. राष्ट्रवादीच्या गोटात सामील झालेल्या मनसेच्या चारही नगरसेवकांनी हा पक्षादेश सपशेल झुगारण्याची तयारी ठेवली असून वेळप्रसंगी शंभर टक्के फुटीचा फायदा घेत ते पक्षातून बाहेर पडण्याचाही विचार सुरू असल्याचे एका नगरसेवकाने सांगितले.
महापौरपदाची निवडणूक दोन दिवसांवर आली असताना मनसेचे सरचिटणीस शिरीष सावंत यांनी पक्षाचे मनपातील गटनेते तथा स्थायी समितीचे सभापती गणेश भोसले यांना शुक्रवारी मुंबईहून एका पत्राद्वारे पक्षादेश बजावला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीला न चुकता हजर राहून सचिन जाधव यांना मतदान करावे. गरज वाटल्यास पक्षाचा मनपातील गटनेता या नात्याने पक्षाच्या अन्य तीन नगरसेवकांनाही अशाच पद्धतीने पक्षादेश बजवावा, असा आदेश या पत्रात देण्यात आला आहे. हा आदेश पाळण्यात हयगय केल्यास किंवा त्या विरोधात मतदान केल्यास सर्वावर अपात्रतेची कारवाई करण्याचा इशाराही या पक्षादेशात देण्यात आला असून त्याची संबंधित कलमेही नमूद करण्यात आली आहेत.
मनसेचा हा पक्षादेश समाज माध्यमांवर (सोशल मीडिया) व्हायरल झाला आहे, मात्र सायंकाळपर्यंत तो मनपातही मिळाला नव्हता व गणेश भोसले यांनाही मिळाला नव्हता. त्यांनीच ही माहिती दिली.
मनसेच्या नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवण्याचा आटोकाट प्रयत्न शिवसेनेने केला. मुख्यमंत्री व राज ठाकरे यांच्या माध्यमातूनच हे प्रयत्न सुरू होते. त्याला या पक्षादेशाच्या रूपाने शुक्रवारी यश आले, मात्र आता वेळ निघून गेली आहे, अशीच सूचक प्रतिक्रिया मनसेच्या गोटातून व्यक्त करण्यात आली. मनसेचे चारपैकी तीन नगरसेवक सत्ताधारी राष्ट्रवादीबरोबर सहलीला रवाना झाला आहेत. आता पक्षादेश झुगारून देण्याच्या तयारीत ते आहेत. वेळप्रसंगी चारही नगरसेवक एकत्र असल्याने शंभर टक्के फूट करून पक्षातून बाहेर पडू, असेही या सूत्रांनी सांगितले.
आकडय़ांचा खेळ
महापौरपदाच्या निवडणुकीत बहुमतासाठी ३४ नगरसेवक हवेत. एक जागा रिक्त असून ६७ नगरसेवकांपैकी ३७ नगरसेवक राष्ट्रवादीकडे (मनसेच्या चौघांसह) तर, २७ ते २८ नगरसेवक शिवसेनेकडे असल्याचे सांगण्यात येते. शिवाय शिवसेनेच्या गोटात सामील झालेले काँग्रेस व राष्ट्रवादीचा प्रत्येकी १ याप्रमाणे दोघे गैरहजर ठेवण्यात येणार आहेत.
पैशाचाही खेळ?
पाच लाख, सात लाख, पंधरा लाख, वीस लाख हे एका बाजूचे आकडे. पंधरा लाख, वीस लाख, बावीस लाख, पस्तीस लाख हे दुसऱ्या बाजूचे आकडे. सहलीवर गेलेले नगरसेवक मौजमजेत गर्क तर आहेतच, मात्र वरील रकमा पोहोच झाल्याची खुलेआम चर्चा शहरात सुरू आहे. खरे काय आणि खोटे काय, हे त्यांनाच माहीत, मात्र ही चर्चाही ओंगळवाणी असून दहा-बारा महिन्यांसाठी महापौरपदाबाबत फारशी चुरस होणार नाही, असा अंदाज असताना केवळ घोडेबाजारासाठी ही चुरस निर्माण करण्यात काहींना यश आल्याची चर्चाही सुरू आहे. यात दोन्ही उमेदवार मात्र कोटी कोटीने पुढे सरकू लागले आहेत. अनपेक्षित चुरशीमुळे त्यांचेही ‘बजेट’ वाढल्याचे सांगण्यात येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा