साफसफाईसाठी कर्मचारी द्या हो, अशी मागणी जवळपासच सर्वच महिला नगरसेविकांनी महापौर त्र्यंबक तुपे यांच्याकडे केली. अस्वछता आणि कचरा उचलणारी यंत्रणा कमालीची ढिली असल्याचे सांगणाऱ्या नगरसेविकांचा आवाज वाढल्यानंतर या अनुषंगाने स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे तुपे यांनी जाहीर केले.
सर्वसाधारण सभेत महिला नगरसेवकांना बोलू द्या, अशी मागणी करत कचरा हटविला जात नसल्याची तक्रार जोरदारपणे मांडली. अनेक भागात केवळ दोनच सफाई कर्मचारी आहेत. अनेक जण परस्पर बदली करून जातात असे सांगण्यात आले. या अनुषंगाने नगरसेवक नंदू घोडेले यांनी शहरातील कचरा समस्येची व्याप्ती समाजावून सांगितली. क्षेत्र अधिकाऱ्याची परवानगी न घेता सोयीनुसार सफाई कर्मचारी वागतात, असे ते म्हणाले. वास्तविक सर्व वॉर्डात समान सफाई कर्मचारी देण्याचा ठराव असतानाही अनेक ठिकाणी सफाई कर्मचारी नसतात. परिणामी शहरातील अनेक ठिकाणचा कचरा उचलला जात नसल्याचा आरोप महिला नगरसेवकांनी केला. दररोज ४५० टन कचरा पडतो पण त्यातील १०० टन कचरा उचललाच जात नाही, असेही सांगण्यात आले. कचऱ्याचा प्रश्न मांडण्यास उभे राहिलेल्या नारेगावच्या नगरसेवकाचे मत ऐकले गेले नाही. कचरा डेपोचे महापालिका काय करणार, असा प्रश्न उपस्थित झाला. मात्र, महिला नगरसेवकांचा आवाज वाढल्याने स्वतंत्र बैठक घेऊ, असे जाहीर करत त्र्यंबक तुपे यांनी सभा गुंडाळली. या बैठकीत पोलीस आयुक्त अमितेशकुमार शहर विकासासाठी चांगले काम करत असून त्यांनी अतिक्रमण हटविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारा ठराव मंजूर करण्यात आला. या वेळी महापालिका अतिक्रमण विभाग कमजोर असल्याची तक्रार काही नगरसेवकांनी केली.

Story img Loader