कोटीच्या कोटी उड्डाणे घेणारे सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर अभियंता सतीश चिखलीकर आणि जगदीश वाघ या दोघांचा जामीन अर्ज शुक्रवारी येथील न्यायालयाने प्रत्येकी ५० लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर मंजूर केला. जात मुचलक्याची पूर्तता होईपर्यंत त्यांना कारागृहात राहावे लागणार आहे. जामिनासाठी जातमुचलक्याची रक्कम निश्चित करताना न्यायालयाने या प्रकरणाचे एकूणच गांभीर्य लक्षात घेतल्याचे दिसते.
जिल्हा व सत्र न्यायालयात न्या. के. के. तंत्रपाळे यांच्यासमोर जामीन अर्जावर आधीच युक्तिवाद झाला होता. त्याबाबतचा निर्णय न्यायालयाने शुक्रवारी जाहीर केला. चिखलीकर व वाघ यांचा जामीन अर्ज प्रत्येकी ५० लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर मंजूर करण्यात आला. कारागृहातून सुटकेसाठी प्रत्येकाला ५० लाखांची मालमत्ता असणारा जामीनदार आणावा लागेल अन्यथा तेवढी रक्कम न्यायालयात भरावी लागणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या तपासात चिखलीकरकडे रोकड आणि राज्यातील बहुतेक भागांत स्थावर मालमत्ता अशी एकूण १८ कोटींहून अधिकची संपत्ती सापडली तर वाघकडेही पावणेतीन कोटींची मालमत्ता आढळून आली. सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता दर्जाच्या एका अधिकाऱ्याकडील माया पाहून खुद्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागही चक्रावून गेला. या प्रकरणाचे गांभीर्य जामीन अर्ज मंजूर करताना न्यायालयाने लक्षात घेतले आहे. चिखलीकर व वाघने ज्ञात स्रोतापेक्षा मोठय़ा प्रमाणात मालमत्ता संपादित केल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच त्या प्रक्रियेत संबंधितांना मदत केल्याच्या पाश्र्वभूमीवर, चिखलीकर व त्याची पत्नी स्वाती तसेच वाघ व पत्नी दीपिका यांच्याविरोधात अपसंपदेचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्यांतही त्यांना पुन्हा कधीही अटक होऊ शकते, असे संकेत तपास यंत्रणेने आधीच दिले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा