सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर अभियंता सतीश चिखलीकर आणि जगदिश वाघ या दोघांचा कारागृहातून बाहेर पडण्याचा मार्ग अखेर सोमवारी मोकळा झाला. ५० लाख रूपयांच्या जात मुचलक्याची पूर्तता करण्यासाठी प्रत्येकाला तीन जामीनदार द्यावे लागले.
चार दिवसांपूर्वी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने चिखलीकर व वाघ यांचा जामीन अर्ज प्रत्येकी ५० लाख रूपयांच्या जात मुचलक्यावर मंजूर केला होता. कारागृहातून सुटकेसाठी प्रत्येकाला प्रत्येकी ५० लाखाची मालमत्ता असणारा जामीनदार आणणे अथवा तेवढी रक्कम न्यायालयात भरावी लागणार होती.
जामीन अर्ज मंजूर करताना या प्रकरणाचे गांभीर्य न्यायालयाने लक्षात घेतले होते. विहित प्रक्रिया सोमवारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती अ‍ॅड. अविनाश भिडे यांनी दिली. जातमुचलक्याची पूर्तता करू शकणारे प्रत्येकी तीन जामीनदार देण्यात आले. न्यायालयाने संबंधितांना कारागृहातून सोडण्याचे आदेशही दिल्याचे अ‍ॅड. भिडे यांनी सांगितले. कारागृहातून सुटका झाल्यानंतर चिखलीकर व वाघ यांना पहिल्या आठवडय़ात दररोज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे.
दरम्यान, ज्ञात स्त्रोतापेक्षा मोठय़ा प्रमाणात मालमत्ता संपादित केल्यावरून चिखलीकर व त्याची पत्नी स्वाती तसेच वाघ व पत्नी दिपीका यांच्याविरोधात अपसंपदेचे दोन स्वतंत्र गुन्हे आधीच दाखल झाले आहेत. दरम्यानच्या काळात स्वाती चिखलीकर व दीपिका वाघ यांनी अटकपूर्व जामिनासाठी सादर केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला.

कारागृहातून सुटका झाल्यानंतर चिखलीकर व वाघ यांना पहिल्या आठवडय़ात दररोज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे.