केंद्रातील मोदी सरकारने काळा पैसा व भ्रष्टाचाराला आळा बसावा म्हणून पाचशे व एक हजाराच्या चलनी नोटा रद्द केल्यानंतर भ्रष्टाचार करणाऱ्या मंडळींनी विशेषत: प्रशासनातील भ्रष्ट प्रवृत्तीने लाच मागताना आता शंभर रुपये दराच्या नोटा देण्याचा आग्रह धरला आहे. महसूल, पोलीस, शिक्षण, सहकार, आरोग्य, बांधकाम आदी सर्व क्षेत्रात लाच घेताना कमीजास्त प्रमाणात शंभर रुपये दराच्या नोटांवर भर दिल्याचे दिसून येते. मोहोळ तालुका पंचायत समितीच्या कार्यालयात अशाच प्रकारे अडीच हजारांची लाच घेताना एका अधिकाऱ्याने शंभर रुपये दराच्या नोटा देण्यास फर्मावल्याचे उजेडात आले.
मोदी सरकारने काळा पैसा व भ्रष्टाचाराला पायबंद घालण्याच्या हेतूने अचानकपणे पाचशे व एक हजार रुपये दराच्या नोटा कालबाह्य़ ठरविल्या आहेत. त्याचे मोदीभक्तांसह भ्रष्टाचाराबद्दल चीड असलेल्या मंडळींनी स्वागत केले आहे. पाचशे व एक हजाराच्या नोटा बदलण्यासाठी नागरिकांना प्रचंड प्रमाणात त्रास सोसावा लागत असताना मोदी सरकारच्या या निर्णयाबद्दल सारेच जण समाधानी दिसून येतात. काळा पैसा व भ्रष्टाचार संपावा, हीच आम आदमीची भावना आहे. परंतु भ्रष्टाचार करणाऱ्या मंडळींनी पाचशे व एक हजार रुपये दराच्या नोटा रद्द झाल्यानंतर आपली लाचेची भूक कमी न करता तशीच कायम ठेवली आहे. हजार व पाचशेच्या नोटा चालत नाही म्हणून काय झाले, लाच घेणे बंद करायचे काय, असा सवाल करीत लाचखोर शासकीय व निमशासकीय यंत्रणेतील भ्रष्ट ‘बाबू’ शंभर रुपये दराच्या नोटा लाचेपोटी आणून देण्याचे फर्मान सोडत आहेत.
लाचखोरीची प्रवृत्ती अशी चालूच असताना जिल्ह्य़ात मोहोळ तालुका पंचायत समितीच्या कार्यालयातील एका कृषी अधिकाऱ्याला शंभर रुपये मूल्याच्या अडीच हजारांची रक्कम लाच म्हणून घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचेसाठी त्याने शंभर रुपये दराच्या नोटाच पाहिजेत, अशी तंबी दिली होती. बाळासाहेब भिकाजी बाबर या कृषी अधिकाऱ्याने हिंगणी (ता. मोहोळ) येथील दत्तात्रेय बेडगे यांच्या मलिकबाबा कृषिसेवा केंद्राच्या परवान्याचा प्रस्ताव तालुका पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेकडे पाठविण्यासाठी लाच मागितल्याची तक्रार होती. लाचेची रक्कम पाचशे व हजार रुपयांच्या कालबाह्य़ चलनी नोटांच्या स्वरूपात न देता शंभर रुपयांच्या चलनातच द्यावी, अशी तंबी बाबर यांनी तक्रारदाराला दिली होती. लाचलुपचत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर कार्यालयातील पोलीस उपअधीक्षक अरुण देवकर यांच्या पथकाने कृषी अधिकारी बाबर यास प्रत्येकी शंभर रुपयांच्या २५ नोटा स्वीकारल्या असता रंगेहाथ पकडले. त्याच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पाचशे व एक हजाराच्या नोटा कालबाह्य़ झाल्या असल्या, तरी विविध शासकीय व निमशासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचारावर त्याचा यत्किंचित परिणाम होत नसल्याचे दिसून येते. रस्त्यावरील वाहतुकीचे नियमन करणारा पोलीस हवालदार पाचशे-एक हजाराची रक्कम लाचेपोटी घेताना शंभर रुपये दराच्या नोटांचा आग्रह धरतो. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, शिक्षण खाते आदी जवळपास सर्व ठिकाणी भ्रष्टाचार करताना नोटांबद्दल योग्य दक्षता घेतली जात असल्याने पीडित नागरिकांपुढे शंभर रुपये दराच्या नोटा उपलब्ध करून देताना कसरती कराव्या लागत आहेत.