येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर अभियंता सतीश चिखलीकर आणि जगदीश वाघ यांच्या पोलीस कोठडीची मुदत १६ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. चिखलीकरच्या नांदेड येथील बँक लॉकरमध्ये शुक्रवारी ३५ लाख रुपये रोख मिळून आल्याने त्याच्या मालमत्तेचा आकडा १७ कोटी ९० लाखांपर्यंत पोहोचला आहे. देयक मंजुरीसाठी ठेकेदाराकडून २२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना चिखलीकर व वाघ यांना पकडण्यात आले होते. अटक झाल्यानंतर न्यायालयाने या दोघांना १० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तिची मुदत शुक्रवारी संपुष्टात आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना शुक्रवारी येथील न्यायालयात उपस्थित केले. संबंधितांकडे मोठय़ा प्रमाणात अवैध मालमत्ता सापडत असल्याने त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत वाढविण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने चिखलीकर व वाघ यांच्या पोलीस कोठडीची मुदत १६ मेपर्यंत वाढविली आहे. दरम्यान, चिखलीकरची मालमत्ता दिवसागणिक वाढतच आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नांदेड येथील त्याच्या बँकेतील लॉकरची तपासणी केली. त्यामध्ये ३५ लाख रुपये मिळून आल्याची माहिती या विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी दिली. आतापर्यंत चिखलीकरकडे १७ कोटी, ९० लाख ८० हजार २९२ रुपयांची मालमत्ता असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा