शेतजमिनीची वडील व भावाच्या नावावर खातेफोड करून त्यानुसार सुधारित सात-बारा उतारा देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना शनिवारी निफाड तालुक्यातील आहेरगाव येथील तलाठी दादा नामदेव घोडेराव याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले. तक्रारदाराच्या आईची मौजे पाचोरे वणी शिवारात आठ हेक्टर ५२ आर शेतजमीन आहे. या जमिनीची वडील व भाऊ यांच्या नावावर खातेफोड करून त्याबाबतची नोंद महसुली रेकॉर्डला करावी आणि त्यानुसार सुधारित सात-बारा उतारा देण्यासाठी दादा घोडेराव या तलाठय़ाने २० हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या संदर्भात तक्रार केल्यावर सापळा रचण्यात आला. शनिवारी दुपारी एक वाजता निफाड तालुक्यातील आहेरगाव येथील तलाठी कार्यालयात ही रक्कम स्वीकारत असताना घोडेरावला पकडण्यात आले. याप्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader