महापालिकेचे सध्या खूप वाईट दिवस सुरू आहेत. येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रोजच्या नव्या प्रतापांमुळे महापालिकेला बदनामीही सहन करावी लागत आहे, परंतु येथील कारभार दुरुस्त होण्याची चिन्हे नाहीत. येथील कर्मचाऱ्यांनी बुधवारी आणखी एक नवीन पराक्रम केला. परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या कुत्र्यांना पकडण्याबाबत निवेदन घेऊन आलेल्या महापालिकेतील आपल्याच सहकाऱ्याला या कर्मचाऱ्यांनी चक्क दीड हजार रुपयांची लाच मागितली.
लाच मागणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. विलास श्रीराम चरडे (४८) आणि सुरेश कृष्णराव डांगे (५३) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी हे महापालिकेच्या आरोग्य विभागात ‘ऐवजदार’ पदावर कार्यरत आहेत. तक्रारदार हे महापालिकेत कर्मचारी असून ते टिमकी येथील दादरा पुलाजवळ राहतात. त्या परिसरात मोकाट कुत्र्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मंगळवारी त्यांनी गांधीबाग झोन कार्यालयात तक्रार दिली होती. या तक्रारीवर कारवाईसाठी आरोपींनी अडीच हजार रुपयांची मागणी केली. मात्र, तक्रारदारांनी एसीबीचे कार्यालय गाठले व तक्रार दिली.
एसीबीचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख, वकील शेख, रविकांत डहाट, दीप्ती, रेखा यादव यांनी सापळा रचून आरोपींना दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणात तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली.