ग्रामपंचायतीच्या विविध निधींमध्ये ४  लाख ३१ हजार ३८ रुपयांचा अपहार केल्याचा ठपका पाडळीआळे ग्रामपंचायतीच्या सरपंच स्वप्नाली बाळासाहेब गुजर व ग्रामसेवक एम. बी. गायकवाड यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गारगुंडी, कान्हूरपठार, वडझिरे, लोणीमावळा, बाभुळवाडे पाठोपाठ पाडळीआळे ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार उघडकीस आल्याने पंचायत राज व्यवस्थेतील भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आला आहे.
पाडळीआळे ग्रामपंचायतीच्या विविध निधींमध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार ग्रामस्थ वसंत थोरात यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे केली होती. तक्रारीनंतर उपमुख्य कार्यकारी अधिका-यांना चौकशीसाठी नेमण्यात आले. ते चौकशीसाठी गेले असता ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप होते. संपर्क करूनही ग्रामसेवक गायकवाड हे हजर न झाल्याने कार्यालयास सील करण्यात आले. त्यानंतर दुस-या एका ग्रामपंचायतीच्या अपहारप्रकरणी ग्रामसेवक गायकवाड यांचे निलंबन झाले.
गायकवाड यांच्या जागेवर दुस-या ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात आल्यानंतर ग्रामपंचायतीचे दप्तर ताब्यात घेऊन तपासणी केली असता अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. अपहार झालेले ४ लाख ३१ हजार ३८ रुपये सरपंच स्वप्नाली गुजर व ग्रामसेवक एम. बी. गायकवाड यांनी प्रत्येकी २ लाख १५ हजार ५१९ रुपये याप्रमाणे तात्काळ जमा करण्याचा अहवाल देण्यात आला आहे. ग्रामपंचायत अधिनियम कायद्यानुसार गैरवर्तणुकीबाबत पुढील कायदेशीर कारवाई का करू नये याबाबतचा स्वयंस्पष्ट खुलासा दहा दिवसांत करण्याचे आदेश गटविकास अधिका-यांनी दिले आहेत.

Story img Loader