जळगाव विभागात महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाने गाजावाजा करून सुरू केलेल्या तब्बल १७ खरेदी केंद्रांपैकी एकाही केंद्राकडे दहा-बारा दिवसांत शेतकरी फिरकलेले नाहीत. शासनाने कापूस खरेदीसाठी तीन हजार ९०० रुपयांचा दर जाहीर केल्याने खासगी व्यापाऱ्यांना चार हजारापेक्षा अधिक दरानेच कापूस खरेदी करावी लागत आहे
महासंघाने यंदा आधारभूत किमतीनुसार कापूस खरेदीसाठी जळगाव विभागात केंद्र सुरू केली आहेत. बन्नी ब्रह्मा या कापसासाठी २९.५ ते ३०.५ मिलिमीटर लांबीचे तंतू हवेत, असा निकष असून एच-४, एच-६ या कापसासाठी तीन हजार ८०० रुपयांचा प्रतिक्विंटल दर आहे. एच-४-५१६६ साठी तीन हजार ७०० तर जे-३४ साठी तीन हजार ६०० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. या विभागात एच-४ वाणाच्या कापसाचे अधिक प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. महासंघाने ३९०० रुपयांचा दर जाहीर केल्याने खासगी व्यापाऱ्यांनी त्यापेक्षा सुमारे २०० रुपये जादा देणे सुरू केले आहे. चोपडय़ात गो. भि. जिनिंग प्रेसिंग कारखान्यात महासंघाने कापूस खरेदी केंद्र सुरु केले आहे. परंतु शेतकऱ्यांचा त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, बाजार समिती सभापती गिरीश पाटील यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर केंद्रात अद्यापही कापूस आलेला नाही. कापसासाठी लागणारा खर्च वाढला असून उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे महासंघाने कापसाला किमान पाच हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.