परभणी : ‘सीसीआय’च्या स्वॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण सांगून गेल्या आठवड्यापासून सर्वत्र ‘सीसीआय’ची कापूस खरेदी बंद झाल्याने त्याचा शेतकर्‍यांना मोठा फटका बसत असून क्विंटलमागे ५०० रूपये कमी दराने खाजगी बाजारपेठेत कापूस विकावा लागत आहे. दरम्यान ही तांत्रिक बिघाड दुरुस्त कधी होणार याबाबत अद्याप ‘सीसीआय’ने कोणताही खुलासा केलेला नाही.

कापसाची विक्री, चुकारे व अन्य आवश्यक तपशीलासंदर्भात सर्व माहिती या स्वॉफ्टवेअरद्वारेच केली जाते. मात्र गेल्या काही दिवसापासून या स्वॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्याचे सांगितले जात आहे. ‘सीसीआय’च्या खरेदी केंद्रावर कापसाने भरलेली वाहने घेवून आलेल्या शेतकर्‍यांना या तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका बसला. केंद्र सरकारच्या भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) यावर्षी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस पणन महासंघाला उपअभिकर्ता म्हणून करार दिला नाही. त्यामुळे ‘सीसीआय’ सर्वत्र स्वतः कापूस खरेदी करत आहेत. गेल्या आठवड्यापासून मराठवाडा विदर्भासह सर्वत्र सुरु असलेली ‘सीसीआय’ची कापूस खरेदी बंद आहे.

यावर्षीच्या खरीप हंगामासाठी केंद्राने ७५२१ रूपये असा कापसाला प्रति क्विंटल दर हमीभावानुसार निश्चित केला आहे. हा दर शेतकर्‍यांना मिळत होता. तथापि अचानक ‘सीसीआय’ची खरेदी बंद झाल्याने कापसाचे दर किमान ५०० रूपयाने घसरले आहे. खाजगी बाजारात सध्या 6900 रूपये दराने कापसाची खरेदी केली जात आहे. सर्वत्रच शेतकर्‍यांना त्यामुळे मोठा आर्थिक फटका सोसावा लागत आहे. कापसाचे दर वाढतील म्हणून शेतकरी गेल्या काही वर्षात हंगामाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत कापूस साठवून ठेवतात. त्यामुळे अजूनही अनेक शेतकर्‍यांकडे कापूस शिल्लक आहे.

राज्यात एकुण ३ कोटी ६ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली असून यातली ‘सीसीआय’ने एक कोटी ३८ लाख क्विंटल खरेदी केलेली आहे. जेव्हा बाजारात ‘सीसीआय’ची खरेदी चालू होती तेव्हा खाजगी दरही व्यवस्थीत होते पण ‘सीसीआय’ची खरेदी बंद झाल्याने आता सारी मदार खाजगी खरेदीवर येवून ठेपली आहे. त्यामुळे खाजगी खरेदीचे भावही ५०० रूपयाने कोसळले आहे. दरम्यान स्वॉफ्टवेअरमध्ये असलेली ही तांत्रिक बिघाड दुरुस्त कधी होणार याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader