विदर्भातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे अद्याप दर्शन नाही; बियाण्यांबाबतचा घोळ कायम

विदर्भात या हंगामात सुरू असलेली कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आबाळ थांबण्याचे कुठलेही संकेत नाहीत. एकीकडे, कापसाने पाच हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. भाव वाढत असले, तरीही उत्पादन मात्र कमालीचे घटले असल्याने या दरवाढीचा कोणताही फायदा शेतकऱ्यांना होण्याची चिन्हे नाहीत. त्याचवेळी बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी प्रतीक्षा करण्यावाचून पर्याय उरलेला नाही.

कापसावर पडलेल्या शेंदरी बोंडअळीमुळे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे आता उघड झाले आहे. बीटी कपाशीचे बियाणे वापरल्यानंतर मुळात सर्व अळयांपासून पिकाला संरक्षण मिळणे अपेक्षित होते. पण, शेंदरी बोंडअळीच्या बाबतीत बीटी बियाणे अयशस्वी ठरत असल्याचे सहा ते सात वर्षांपूर्वीच लक्षात आले होते. सुरुवातीची काही वष्रे बीटी तंत्रज्ञानाने बोंडअळीला चांगला अटकाव केला होता, पण गेल्या काही वर्षांमध्ये बीटी कपाशीला या अळीने प्रतिकार क्षमता विकसित केल्याचे निदर्शनास आले. कृषी विभागाला याचे गांभीर्य लक्षात आले नाही. बोंडअळीपुढे बीटी कपाशी अपयशी ठरत असल्याचा अहवाल कृषी विभागाने गेल्या वर्षी जुलै महिन्यात सरकारला दिला होता, पण तोवर उशीर होऊन गेला. बोंडअळीला अटकाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी अतिविषारी कीटकनाशकांचा अमर्याद वापर सुरू केला, त्याकडेही कुणाचे लक्ष नव्हते. जेव्हा पन्नासहून अधिक शेतकरी आणि शेतमजूरांचे विषबाधेने मृत्यू झाले, तेव्हा सरकारला जाग आली.

मुळात विदर्भातील अनेक शेतकऱ्यांना मान्यता नसलेले आणि तणनाशकाला सहनशील असलेले (एच.टी.) अवैध कापूस बियाणे विकण्यात आल्याची बाब ‘साऊथ आशिया टेक्नॉलॉजी सेंटर’ने केंद्र सरकारच्या जनुकीय अभियांत्रिकी मूल्यमापन समितीला (जीईएसी) पाठवलेल्या पत्रात नमूद केली होती. आता यासंदर्भात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची विनंती राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. कापूस बियाण्यांचे नमुने अप्रमाणित आढळून आल्यानंतर अशा ११० प्रकरणांमध्ये न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. या बियाण्यांची अवैध विक्री करणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण, झालले नुकसान भरून निघणारे नाही.

यंदाच्या खरीप हंगामात राज्यात एकूण १ कोटी ६० लाख तर विदर्भात एकूण ७३ लाख बीटी कापूस बियाण्यांची पाकिटे वापरण्यात आली. बीजी-२ या बीटी वाणाची शेंदरी बोंडअळीस असलेली प्रतिकार क्षमता कमी झाल्याने गेल्या ५ डिसेंबपर्यंत सुमारे १ लाख ३१७ हेक्टर क्षेत्रावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी सुमारे १ लाख २ हजार शेतकऱ्यांनी केल्या आहेत, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रात कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) योजनेअंतर्गत कीड व रोगांचे सर्वेक्षण करून मोफत एसएमएस, वार्ताफलक, घडीपत्रिका, गावभेटी आणि इतर प्रसार माध्यमाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. तरीही एवढे नुकसान कसे काय झाले, याचे उत्तर कुणाकडे नाही. सरकारच्या लेखी केवळ १ लाख शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, मात्र राज्यातून दहा लाख शेतकऱ्यांनी बोंडअळीसंदर्भात तक्रारी केल्याचे वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांचे म्हणणे आहे. हा मोठा विरोधाभास आहे. बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी एनडीआरमार्फत ६ हजार ८०० रुपये, पीक विमा ८ हजार रुपये आणि कापूस नियंत्रण कायद्याअंतर्गत कंपन्यांकडून मिळणारे १६ हजार रुपये अशी एकूण साधारण ३० हजार रुपये प्रतिहेक्टरी मदत बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना मिळू शकेल, अशी आशा किशोर तिवारी यांना आहे, पण सरकारी पातळीवर अजूनही ‘अभ्यास’च सुरू आहे.

राज्य सरकारच्या प्राथमिक पाहणीनुसार ४३ लाख हेक्टर लागवडीपैकी सुमारे ३३ ते ३४ लाख हेक्टरवरील कापसाचे पीक बाधित झाल्याचा अंदाज आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्यास मदत प्रति शेतकऱ्याला दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाते. यातून शेतकऱ्यांच्या हाती काय लागणार हा एक प्रश्न आहे. कपाशीचे पीक आतबट्टयाचे ठरू लागल्याने आता शेतकरी इतर पिकांकडे वळत आहेत. यंदा कपाशीवर एवढा प्रकोप झाला की, पूर्वहंगामी कपाशीचे उत्पादन एकरी पाच क्विंटलही जेमतेम मिळू शकले. कोरडवाहू कपाशीत तर एकरी पन्नास किलोही उत्पादन मिळाले नाही. मुळात बीटी वाणांच्या बियाण्यांचा खर्च एकरी ३ हजार रुपये आहे. बीटी कपाशीमुळे उत्पादन वाढल्याचे सांगितले जात असले, तरी उत्पादन खर्चातही वाढ झाली आहे. कोरडवाहू शेतीत सध्याचा एकरी उत्पादन खर्च १५ ते २० हजार रुपये आहे, तो पूर्वी ७ हजारांच्या जवळपास होता, असे शेतकरी सांगतात. यंदा बोंडअळीने नुकसान केल्याने उत्पादकता कमी झाली. बाजारात कापसाचे भाव वाढले आहेत, काही ठिकाणी ते साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहचले आहेत. भाव वाढूनही शेतकऱ्यांकडे मात्र कापूस नाही, अशी स्थिती आहे.

बीटी कपाशीचा प्रश्न गंभीर

बीटी कपाशीचा प्रश्न आता अधिकच गंभीर झाला आहे. बीजी-२ तंत्रज्ञानाप्रती शेंदरी बोंडअळीमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याने उद्भवलेल्या परिस्थितीची जबाबदारी मोन्सॅन्टो कंपनीने स्वीकारावी, अन्यथा येत्या हंगामात बियाणे कंपन्या बीटी वाणांची विक्री करणार नाहीत, असा इशारा नॅशनल सीड असोसिएशनने दिला आहे. त्यामुळे बियाण्यांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने राज्य शासनाच्या वतीने बीटी बियाण्यांना संकरित बियाणे म्हणून विक्रीस मान्यता देण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. त्यासंदर्भात काय हालचाली झाल्या, हे सांगण्यात कुणी तयार नाही. बियाण्यांविषयी घोळ अजूनही कायम आहे. विदर्भाचे यंदा कर्जमाफीच्या घोळात रखडलेले पीक कर्जवाटप, परतीच्या पावसाने सोयाबीनची झालेली हानी, पूर्व विदर्भात धान उत्पादकांचे मावा आणि तुडतुडय़ामुळे झालेले नुकसान, बोंडअळीचा हल्ला यातून सावरण्याची संधी शेतकऱ्यांना मिळू शकली नाही. आता तरी विनाविलंब मदत मिळावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

Story img Loader