केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने खरीप पिकांचे हमीभाव जाहीर केल्यानंतर तुटपुंज्या वाढीवरून विदर्भात शेतकऱ्यांचे आंदोलन पेटण्याच्या बेतात आहे. विदर्भाचे प्रमुख पीक असलेल्या कापूस, सोयाबीन आणि धानाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी हमीभाव मिळाल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून कापसाच्या हमीभावात केवळ प्रतिक्विंटल १०० रुपये, तर सोयाबीनच्या हमीभावात अवघी ३६० रुपये वाढ झाल्याने आधीच मेटाकुटीस आलेल्या कास्तकारांमधील असंतोषाला धुमारे फुटण्यास सुरुवात झाली आहे. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि नागपूरच्या पट्टय़ात होणाऱ्या धानाला फक्त ६० रुपयांची वाढ मिळाली आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पीक असलेल्या उसाच्या हमीभावात तब्बल ७०० रुपयांची वाढ देण्यात आली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी शुक्रवारी कापसाला ३७०० रुपये, तर सोयाबीनला २५६० रुपये हमीभाव जाहीर केला. गेल्या खरीप हंगामात कापसाला ३६०० रुपये, तर सोयाबीनला २२०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव देण्यात आला होता. कृषी मूल्य आयोगाने उसाच्या हमीभावात गेल्या तीन वर्षांत दुप्पट वाढ करून या खरीप हंगामासाठी २८०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. धानाच्या हमीभावात जेमतेम ६० रुपये वाढ करून १३१० रुपये भाव जाहीर करण्यात आला. सूर्यफूल, उडीद, मूग, राई या पिकांच्या हमीभावात वाढ करण्यात आलेली नाही. ज्वारी व बाजरीच्या हमीभावात प्रतिक्विंटलमागे ७५ रुपये वाढ करण्यात आली आहे. तूरडाळीच्या हमीभावात ४५० रुपये वाढ करून केंद्राने ४३०० रुपये भाव जाहीर केला आहे. केंद्र सरकारने अंतिम स्वरूपात कापूस, धान व सोयाबीनच्या हमीभावात नाममात्र वाढ करून विदर्भातील शेतक ऱ्यांना अक्षरश: वाऱ्यावर सोडले आहे. विदर्भातील कापूस व सोयाबीन या नगदी पिकांचा हमीभाव फारच कमी असून राज्य सरकारने कृषी मूल्य आयोगाच्या वाढीव हमीभावासाठी पाठपुरावा न केल्यामुळे ही स्थिती ओढवल्याचा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. कापूस, सोयाबीन व धानाच्या हमीभावात नाममात्र केलेली वाढ अन्यायकारक असून सरकारने कापसाचा हमीभाव ६ हजार रुपये प्रतिक्विंटल, सोयाबीनचा ४ हजार रुपये, तूर ५ हजार रुपये आणि धानाला २ हजार रुपये हमी भाव द्यावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे. पिकाला लागणारा खर्च, खत, बियाणे व कीटकनाशकांच्या भावात झालेली वाढ, गेल्या वर्षांचा बाजारभाव, शेतकऱ्यांच्या घरची मजुरी, पीक कर्जावरील व्याज याचा प्रामुख्याने विचार करून जिल्हानिहाय माहिती गोळा करून कृषी मूल्य आयोग पिकांचे हमीभाव ठरविते. याच सूत्राने विदर्भातील कोरडवाहू क्षेत्रातील पिकांचे हमीभाव काढले तर कापसाला ६२६०, तुरीला ५२४०, सोयाबीनला ४२६० आणि धानाला १७४० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळण्याची गरज आहे, याकडे तिवारी यांनी लक्ष वेधले.
कापूस हमीभावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; अल्प वाढीने कास्तकारांमध्ये असंतोष
केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने खरीप पिकांचे हमीभाव जाहीर केल्यानंतर तुटपुंज्या वाढीवरून विदर्भात शेतकऱ्यांचे आंदोलन पेटण्याच्या बेतात आहे. विदर्भाचे प्रमुख पीक असलेल्या कापूस, सोयाबीन आणि धानाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी हमीभाव मिळाल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून कापसाच्या हमीभावात केवळ प्रतिक्विंटल १०० रुपये, तर सोयाबीनच्या हमीभावात अवघी ३६० रुपये वाढ झाल्याने आधीच मेटाकुटीस आलेल्या कास्तकारांमधील असंतोषाला धुमारे फुटण्यास सुरुवात झाली आहे.
First published on: 01-07-2013 at 07:22 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cotton fix rate issue comes on stage