लोकसत्ता वार्ताहर
हिंगोली: भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) वतीने कापूस खरेदी बंद केली आहे. मात्र, शेतकऱ्यांकडे अद्यापही जवळपास १५ते २० टक्के कापूस शिल्लक आहे. हा कापूस विक्रीसाठी खासगी जिनिंगमध्ये नेण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय राहिला नाही. त्यामुळे कापसाचे भाव १०० रुपयांनी घसरले आहेत.
भारतीय कापूस महामंडळाच्या वतीने जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र वेळेत सुरू न झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. नोव्हेंबरमध्ये कापूस खरेदी केंद्र सुरू झाले. हिंगोली शहराजवळील लिंबाळा (मक्ता), वसमत तालुक्यातील हयातनगर फाटा, औंढा नागनाथच्या जवळाबाजार व शिरड शहापूर या ठिकाणी कापूसखरेदीला प्रारंभ झाला.
सुरुवातीला या कापूस केंद्रांवर ७ हजार ५२६ रुपये प्रतिक्विंटल असा दर होता. खासगी जिनिंगच्या तुलनेत भाव वाढवून मिळत असल्याने हंगामाच्या प्रारंभापासूनच शेतकऱ्यांचा सीसीआय केंद्राकडे कापूस विक्रीचा कल होता. परिणामी केंद्रांवर गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कापसाची खरेदी-विक्री अधिक झाली. जानेवारी,फेब्रुवारीमध्ये खरेदी केलेला कापूस ठेवण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने केंद्रावरील खरेदी बंद करण्याची वेळ आली होती. सिंचन क्षेत्र भागातील शेतकऱ्यांकडे अजूनही १५ ते २० टक्के कापूस शिल्लक आहे. परंतु, सीसीआयने खरेदी गुंडाळल्याने या शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.