मागील आठवड्याभरापासून कापसाचे दर सातत्याने वाढत आहेत. एका आठवड्यामध्ये कापसाचे दर साडेनऊ हजारावरून एकदम दहा हजारावर गेलेत. मागील दोन दिवसांमध्ये कापसाच्या भावाने पुन्हा उचल खाल्ली असून सध्या कापूस दहा हजार ४०० ते दहा हजार ५०० रुपये प्रति क्विंटलने विकला जाऊ लागलाय. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा आठवडा ऐतिहासिक ठरत आहे. कापसाला जवळजवळ ५० वर्षानंतर एवढा भाव मिळालाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कापसाची कमी उपलब्धता आणि बाजारपेठेत कापसाला मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील चार ठिकाणी कापसाच्या दराने दहा हजाराचा टप्पा ओलांडला. फुलसावंगी बाजारपेठेत कापसाला सर्वाधिक १० हजार ४००  रुपयांचा विक्रमी दर मिळाला. यवतमाळ, राळेगाव आणि वणी  बाजारपेठेतही कापसाचा दर दहा हजारांच्या ४४० रुपये क्विंटलहून अधिक झालाय. जिल्ह्याच्या ५० वर्षांच्या इतिहासात  पहिल्यांदाच कापसाला दहा हजारांहून अधिकचा दर मिळाला. त्यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी सुखावला आहे. मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाल्यामुळे मागील आठ दिवसांपासून कापसाचे दर सारखे वाढत होते. त्यातच सरकीचे दर २८०० रुपयांवरून चार हजार रुपये क्विंटलवर पोहोचल्याने खुल्या बाजारपेठेत कापसाच्या दराला झळाळी मिळाली आहे.

या सर्व गोष्टींमुळे यवतमाळ जिल्ह्यात कापसाच्या दराने विक्रमी १० हजाराचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यात बुधवारी एकाच दिवसात ३२ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. जिल्ह्यातील यवतमाळ, फुलसावंगी, राळेगाव, वणी, वाढोणाबाजार, कळंब घाटंजी, आर्णी, दारव्हा, नेर या बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक वाढली. याचवेळी कापसाचे दरही वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. कापसाचा हमीदर सहा हजार २५ रुपये आहे. तर खुल्या बाजारात कापसाचे दर दहा हजार ४०० रुपये आहेत. जिल्ह्यात ३५ ते ४० लाख क्विंटल कापसाचे उत्पादन होते. यावर्षी डिसेंबर अखेरपर्यंत केवळ ११ लाख लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. जिल्ह्यातील एकूण उत्पादनाच्या तुलनेत कापसाचे उत्पादन ४० टक्क्यांनी घटले आहेत. त्यातच मागणी वाढल्याने दराने उसळी घेतली.

कापसाला सध्या दहा हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. सरकारचे धोरण स्पष्ट नाही. आतापर्यंत शेतकर्‍यांच्या पिकाला कधीही इतका भाव मिळाला नाही. सरकारने पिकांना भाव देताना आपले धोरण स्पष्ट केले पाहिजे. कापसाची आवक कमीच आहे. पावसाळ्यात पिकांचे नुकसान कमी झाले असले तरी नुकसान तसे कमीच आहे. पहिल्या वेचात चांगला कापूस निघाला, असं जैन कोटेक्सच्या सुनील जैन यांनी सांगितलं.

मात्र हे दर स्थिर नसल्याने शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. दोन दिवसांपूर्वी कापसाला चांगला भाव होता. आता नऊ हजार ५०० रुपये भाव मिळत आहे. शेतकरी मोठ्या अपेक्षेने जगत आहे. कापसापासून विविध वस्तूंची निर्मिती केली जाते. मात्र, भाव मिळत नाही. बोंडअळीने नुकसान होत आहे. ते कधीही भरून निघत नाही. २० क्विंटल कापूस विक्रीसाठी आणला. परंतु, भाव कोणता मिळेल हे सांगता येत नाही, असं या ठिकाणी कापूस विक्रीसाठी आलेल्या मनीष जाधव या शेतकऱ्याने सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cotton rate per quintal in maharashtra cotton rate goes as high as 10400 quintal in yavatmal scsg