कॅबिनेट मंत्री हजर नसल्यास सभागृह डोक्यावर घेत ते तहकूब करण्याची मागणी गेली १५ वर्षे करणारे भाजप-शिवसेना हे विरोधी पक्षातून सत्तेवर आल्यावर मंगळवारी त्याच कारणासाठी विधानपरिषदेचे कामकाज पाच मिनीटे तहकूब करावे लागले.
महसूल मंत्री एकनाथ खडसे हे राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देणार होते. पण ते सभागृहात हजर नसल्याने उपसभापती वसंत डावखरे यांनी कॅबिनेट मंत्रीही हजर नसल्याच्या कारणामुळे सभागृह तहकूब केले.
लगेचच भाजपचे आमदार धावत विधिमंडळ कामकाज मंत्री गिरीश बापट यांच्याकडे आले. अन्य मंत्र्यांनाही निरोप गेले. तेव्हा खडसे, बापट, दिवाकर रावते, पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर, विजय शिवतारे आदी मंत्री विधानपरिषदेत दाखल झाले आणि कामकाज सुरळीत सुरु झाले.