अल्पसंख्यकांना नोकरी व शिक्षणात २० टक्के आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुस्लीम आरक्षण महासंघाच्या वतीने २९ मार्च रोजी येथे विभागीय पातळीवरील आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक माजी महापौर आसिफ शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अल्पसंख्यकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याची तसेच शासकीय-निमशासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची आवश्यकता आहे. देशाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अल्पसंख्यकांना किमान २० टक्के आरक्षण मिळावे या मागणीचा शासनदरबारी पाठपुरावा करण्यासाठी अडीच महिन्यांपूर्वी येथे मुस्लीम आरक्षण महासंघ या बिगर राजकीय संघटनेची स्थापना करण्यात आली. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये या संदर्भात दौरे केले असता सर्वच ठिकाणी या मागणीला लोकांचे जोरदार समर्थन लाभल्याचा दावा आसिफ शेख यांनी केला.
या आरक्षण परिषदेचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते इसाकशेठ जरीवाले हे भूषविणार असून, ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे महासचिव मौलाना सय्यद मोहंमद वली, दिग्दर्शक महेश भट्ट, फारुक शेख, मौलाना सय्यद महेमूद असद, मौलाना सय्यद अतहर, हाफिज नदीम सिद्दिकी आदी मान्यवर यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेसाठी किमान एक लाख लोक उपस्थित राहतील, अशी शक्यता शेख यांनी व्यक्त केली.
परिषदेच्या जनजागृतीसाठी दोन दिवस आधी शहरात मोटारसायकल फेरी काढण्यात येणार आहे. या मागणीसाठी लोकांनी राष्ट्रपती, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना वैयक्तिक पत्रे पाठविण्यासाठी महासंघातर्फे प्रयत्न करण्यात येत असून, परिषदेच्या ठिकाणी लोकांनी ही पत्रे आणून द्यावीत, असे आवाहनही शेख यांनी केले आहे.