नीरज राऊत
टाळेबंदीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्येचे प्रमाण वाढत असल्याने पालघरमधील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाने पुढाकार घेत समाजमाध्यमांतून त्यांचे समुपदेशन सुरू केले आहे. विद्यार्थ्यांशी वैयक्तिक संपर्क करण्यात येत असल्याने पालकांकडून याचे कौतुक होत आहे. समाजमाध्यमांद्वारे विविध स्पर्धा आयोजित करीत त्यांत विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवले जात आहे.
वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावलेल्या विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेचे वेळापत्रक, पुढील प्रवेश प्रक्रिया असे अनेक प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेविषयी प्रमाणपत्र अभ्यासक्रम, संशोधनाला चालना देणारी ‘शोधयात्रा’ स्पर्धा आयाजित करण्यात आली आहे. यासाठी आवश्यक माहिती व मार्गदर्शन शिक्षकांकडून समाजमाध्यमांतून त्यांना दिले जात आहे. सामाजिक विषयांवर विचार मांडणारी लघु चित्रफीत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अँड्रॉइड अॅप्लिकेशन तयार करणे, जाहिरात व पोस्टर बनवविणे अशा स्पर्धाही घेण्यात येत आहेत. पाच हजार विद्यार्थ्यांची प्राध्यापकांना वर्गनिहाय जबाबदारी देण्यात आली असून त्यांचे व्हाट्सअप ग्रुप केले आहेत. यात करोना संसर्ग रोखण्यासाठी शास्त्रशुद्ध माहितीचा प्रसार, दररोजची खरी माहिती देण्यात येत आहे. प्रत्येक प्राध्यापक हा दररोज किमान दहा ते पंधरा विद्यर्थ्यांशी वैयक्तिक संपर्क साधत आहे.