सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील कार्यालयातील लहान-मोठय़ा अशा तब्बल ७११ मोजमाप पुस्तिका गायब आहेत! या मोजमाप पुस्तिका आणून देण्यासाठी चक्क जाहीर प्रकटन देण्याची नामुष्की बांधकाम विभागावर आली!
कोणत्याही कामासाठी सुरुवातीला खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले जाते. त्यानंतर कामाची मंजुरी घेऊन जाहीर निविदा प्रसिद्धीस दिली जाते वा जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधकाकडे मजूर संस्थेला काम देण्यासाठी कळविले जाते. निविदा प्राप्त झाल्यानंतर कमी दराच्या निविदा मंजूर करून कामाचे लिखित आदेश दिले जातात. काम सुरू झाल्यानंतर काम पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी मोजमाप पुस्तिकेत त्याची नोंद केली जाते. अंतिम देयक देण्यासाठी मोजमाप पुस्तिका त्यासोबत जोडावी लागते.
लातूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने २९ एप्रिलला स्थानिक वृत्तपत्रातून मोजमाप पुस्तिका गहाळ झाल्यासंबंधीचे जाहीर प्रगटन प्रसिद्धीस दिले. दहा दिवसात मोजमाप पुस्तिका दाखल न केल्यास नोंदविलेली देयके रद्द समजण्यात येतील व देयकाचे पसे दिले जाणार नसल्याचे कार्यकारी अभियंत्यांनी नमूद केले होते. गायब मोजमाप पुस्तिकेत सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभाग क्रमांक एकमधून ६८ लहान, तर ३६ मोठय़ा, उपविभाग क्रमांक दोनमधून १०५ लहान, तर ६५ मोठय़ा, उपविभाग चाकूरमधून ७४ लहान तर ३२ मोठय़ा, अहमदपूरमधून ४५ लहान तर ४२ मोठय़ा, औशामधून ५३ लहान तर ५२ मोठय़ा, रेणापूरमधून ४१ लहान तर ४८ मोठय़ा, इमारती उपविभाग क्रमांक दोनमधून २४ लहान तर २६ मोठय़ा मोजमाप पुस्तिका गायब आहेत. एकूण ४१० लहान व ३०१ मोठय़ा मोजमाप पुस्तिका विभागात सापडतच नाहीत.
माहिती अधिकाराचे कार्यकत्रे मल्लिकार्जुन भाईकट्टी यांनी कंत्राटदार, मजूर सहकारी संस्था, उपविभागीय अभियंता व शाखा अभियंता यांनी जाणूनबुजून या पुस्तिका गायब केल्याचा आरोप केला. मोजमाप पुस्तिका शाखा अभियंत्याकडे असायला हव्यात. त्या पुस्तिका गायब झाल्याच कशा, असा प्रश्न करून मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या प्रकरणी उपविभागीय अभियंते, प्रत्येक विभागातील ५ शाखा अभियंते व कार्यकारी अभियंता यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
मोजमाप पुस्तिका गहाळ झाल्याबाबत वृत्तपत्रातून जाहिरात देण्याची वेळ राज्यात बहुधा पहिल्यांदाच लातूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागावर आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री या प्रकाराकडे किती गांभीर्याने पाहतात? यावर संबंधितांवर कोणती कारवाई होईल, हे ठरणार आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागातील मोजमाप पुस्तिकाच गायब होण्याच्या प्रकाराची चर्चा चवीने केली जात आहे.