मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर व शिक्षक, कोकण पदवीधर तसेच नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांमध्ये आज, सोमवारी मतमोजणी होणार आहे. पसंती क्रमानुसार मतदान असल्याने मतमोजणीला विलंब लागू शकतो. पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघांमध्ये आधी सर्व मतपत्रिकांची छाननी केली जाते. त्यातील बाद मते बाजूला केल्यावर एकूण वैध मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतांचा कोटा निश्चित केला जातो.

हेही वाचा >>> मुख्य सचिवपदावरील पुरुषी मक्तेदारी मोडीत

उमेदवाराला विजयासाठी पहिल्या पसंतीची तेवढी मते मिळावी लागतात. तेवढा मतांचा कोटा पूर्ण न करू शकल्यास दुसऱ्या फेरीची मतांची मोजणी केली जाते. ही प्रक्रिया फारच किचकट असते. एखादा उमेदवार पहिल्या पसंतीचा मतांचा कोटा पूर्ण न करू शकल्यास जेवढी पसंतीक्रमाची मते असतात तेवढी सारी मते मोजावी लागतात. तेवढे करूनही उमेदवाराला मतांचा कोटा पूण करता आला नाही तर सर्व मतांची मोजणी होऊन सर्वाधिक मते मिळालेला उमेदवार विजयी घोषित केला जातो. ही मतमोजणीची प्रक्रिया वेळकाढूपणाची आहे. यामुळे मतमोजणीला बराच वेळ लागतो. कोकण पदवीधरमध्ये १ लाख ४०हजारांच्या आसपास मतदान झाले. तेथे मतांचा कोटा पहिल्या फेरीत उमेदवार पूर्ण करू शकला नाही तर मतमोजणीला वेळ लागू शकतो. मुंबई शिक्षकमध्ये कमी मतदार असल्याने तेथील निकाल लवकर लागेल अशी अपेक्षा आहे.