दोन लहान मुलांची हत्या करून जोडप्याने आत्महत्या केल्याची घटना अलिबाग शहरातील मांडवी मोहल्ला येथे घडली आहे. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक शैलेश सणस तपास करत आहेत.

पुण्यातील शिक्रापुर येथील एक महिला २५ वर्षी महिला आणि २९ वर्षीय पुरुष पाच पाच वर्षाची मुलगी आणि तीन वर्षाच्या मुलाला घेऊन अलिबाग येथे आले होते. मांडवी मोहल्ला येथील ब्लॉसम कॉटेज येथे हे चौघेही ११ तारखेपासून वास्तव्याला होते. आज चौघांचे मृतदेह ते राहत असलेल्या खोलीत आढळून आले. दोन्ही मुलांची हत्या करून या दोघांनी गळफास लाऊन आत्महत्या केली असण्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे.

घटनेची माहिती पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामे करून चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केले आहे. पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांनीही घटना स्थळाची पहाणी केली आणि या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिलेत. या घटनेनंतर अलिबाग शहरात खळबळ उडाली आहे.

पुणे जिल्ह्यातील शिक्रापुर पोलीस ठाण्यात चौघेही बेपत्ता असल्याची नोंद आहे. तेथील पोलीसांच्या मदतीने अलिबाग पोलीसांनी तपास सुरु केला आहे. त्यानंतरच या प्रकरणाच्या कारणांचा उलगडा होऊ शकेल असे पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांनी स्पष्ट केले.