प्रेमविवाहाला कुटुंबाचा विरोध असल्याने दीपक भगवान तोतडे (२२) व विजया विकास लांडगे (२०) या प्रेमीयुगलाने देहली गावाजवळ वर्धा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली.

कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील दीपक तोतडे व नांदाफोटा येथील विजया लांडगे यांचे प्रेमसंबंध होते. या दोघांनी प्रेमविवाहाची परवानगी कुटुंबीयांकडे मागितली, परंतु दोघांच्याही कुटुंबीयांनी प्रेमविवाहाला नकार दिला. कुटुंबीय विरोधात असल्याने दोघेही २५ ऑक्टोबरला घरातून निघून गेले. त्यामुळे २६ रोजी मुलाच्या, तर २७ रोजी मुलीच्या वडिलांनी मूल बेपत्ता असल्याची तक्रार गडचांदूर पोलिस ठाण्यात नोंदविली. या आधारावर पोलिस या दोघांचा शोध घेत असतांनाच बल्लारपूर तालुक्यातील देहली गावाजवळ वर्धा नदीत दोघांचे मृतदेह तरंगतांना दिसले. त्यांनी या घटनेची माहिती बल्लारपूर पोलिसांना दिली.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ओळख पटविली असता गडचांदूर येथील दीपक व विजया यांचे मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेनंतर कुटुंबीयांना बोलावून ओळख पटवून घेण्यात आली. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविण्यात आले.

Story img Loader