सोलापूर : सांगोला तालुक्यातील शिरभावी गावाजवळ पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने दुचाकीला ठोकरल्याने घडलेल्या अपघातात दुचाकीवरील दाम्पत्याचा मृत्यू झाला. तर त्यांचा किशोरवयीन मुलगा जखमी झाला. याप्रकरणी पिकअप वाहनचालकाविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.धनंजय तुकाराम क्षीरसागर (वय ५०) आणि त्यांच्या पत्नी सुवर्णा (वय ४४, रा. शिरभावी) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. त्यांचा मुलगा ब्रह्म (वय १४) हा जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
मृत धनंजय क्षीरसागर हे महाराष्ट्र बँकेत रोखपालपदावर सेवारत होते. मूळचे शिरभावीत राहणारे धनंजय क्षीरसागर यांनी अलीकडे सांगोल्यात स्वतःचे घर बांधले होते. त्यामुळे ते कुटुंबीयासह शिरभावी ते सांगोला असे दररोज ये-जा करीत होते. नेहमीप्रमाणे ते आपल्या दुचाकीवरून सकाळी पत्नी व मुलासह सांगोल्याहून शिरभावीकडे निघाले असताना तेथून जवळच पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एका पिकअप वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. यात दोघे पती-पत्नी गंभीर जखमी होऊन मृत्यू पावले. मृत धनंजय क्षीरसागर यांच्या पश्चात वृद्ध आई, भाऊ, भावजय, एक मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे त्यांची एक मुलगी वैष्णवी हे कोल्हापुरात कायद्याचे पदवी शिक्षण घेत आहे. तर दुसरी मुलगी ऋतुजा ही अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे.
पित्याच्या डोळ्यांदेखत मुलाचा मृत्यू
सांगोला तालुक्यात घडलेल्या दुसऱ्या रस्ते अपघातात रस्ता ओलांडताना पित्याच्या डोळ्यांदेखत चिमुकला मुलगा एका भरधाव मोटारीखाली सापडून मृत्युमुखी पडला. सांगोला-सोलापूर रस्त्यावर वाडेगावनजीक राजापूर पाटीजवळ हा अपघात घडला. सिद्धार्थ चेतन वायदंडे (वय अडीच वर्षे) असे दुर्देवी मृत बालकाचे नाव आहे. चेतन रमेश वायदंडे (रा. वाडेगाव) हे आपल्या भावाला भेटण्यासाठी आले होते. रात्री तेथून परत आपल्या घराकडे जात असताना ते मुलासह रस्ता ओलांडत होते. परंतु, त्याचवेळी अचानकपणे भरधाव वेगाने आलेल्या पिकअप वाहनाने चेतन वायदंडे यांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या लाडक्या मुलाला जोरात ठोकरले. पिकअपचालकाविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अलिकडे सोलापूर शहर व ग्रामीण भागात रस्ते अपघातांची संख्या वाढली आहे. सोलापूर शहरात जड वाहतुकीचे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह अनेक बळी पडत आहेत. त्यामुळे शहरात जड वाहतुकीवर निर्बंध घातले गेले तरीही सिमेंट-वाळू मिश्रणाची वाहतूक करणाऱ्या बलकरसारख्या जड वाहनांची शहरात राजरोसपणे वाहतूक होत आहे. त्यातून अक्कलकोट रस्त्यावर बलकर गाड्यांखाली चेंगरून निष्पाप व्यक्ती मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.