औरंगाबादमध्ये पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला पोस्को कायद्यान्वये २० वर्षांची सक्तमजूरी आणि ५० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायधीश निंबाळकर यांनी ही शिक्षा सुनावली.
सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन मुलीच्या आईने तक्रार दिली होती. तक्रारीनुसार २७ जानेवारी २०१९ रोजी रात्री १० वाजता आरोपीने पत्नी बाळांतपणासाठी गेल्याची संधी साधत स्वतःच्या १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. विशेष म्हणजे त्यानंतर बापाने अनेकवेळा मुलीवर अत्याचार केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोक्सो, बालअत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल
या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोक्सो, बालअत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक साधना आढाव यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारी वकील सुदेश शिरसाठ यांनी साक्ष नोंदवल्या. पीडित मुलीसह डॉक्टरांची साक्ष महत्वाची ठरली.
हेही वाचा : कोल्हापुरात अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्कार, दोषीला १० वर्षांचा सश्रम तुरुंगवास
न्यायालयाने आरोपीला पोस्को कलम ४ अन्वये १० वर्ष सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ वर्ष साधी कैद तसेच पोस्को कलम ६ अन्वये २० वर्ष सक्त मजुरी आणि ४० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष साधी कैद अशी शिक्षा सुनावली. न्यायालयात पैरवी अधिकारी म्हणून जमादार अश्पाक कादरी यांनी काम पाहिले.