नगर : औरंगाबादचे उच्च न्यायालय, नगरच्या जिल्हा न्यायालयासह विविध ठिकाणच्या न्यायालयात काम पाहणाऱ्या तोतया वकिलाचे बिंग फुटले आहे. मंगलेश भालचंद्र बापट (रा. कर्जत) असे या तोतया वकिलाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध वकिलीची बनावट सनद व खोटी कागदपत्रे तयार करून लोकांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने कर्जतच्या पोलिस निरीक्षकांना दिले आहेत. न्यायालयामार्फत झालेल्या चौकशीत बापट हा सन २००१ पासून म्हणजे गेल्या १८ वर्षांपासून विविध न्यायालयात वकील म्हणून काम पाहत असल्याचे निष्पन्न झाले.

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील ए. जी. ढगे यांनी काम पाहिले. या निकालाच्या प्रती न्यायालयाने महाराष्ट्र-गोवा बार कॉन्सिल, मध्य प्रदेश बार कौन्सिल व बार कौन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडे पाठवण्याचे आदेशही दिले आहेत.

या प्रकरणाची पाश्र्वभूमी अशी, येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश नावंदर यांच्या न्यायालयात एका गुन्ह्य़ात नागेश मारुती मेगडे यांच्यावतीने मंगलेश बापट यांनी अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जात विरुद्ध बाजूचे युवराज हनुमंत नवसरे यांनी न्यायालयात अर्ज करून बापट हे वकील नसतानाही त्यांनी अर्जदाराच्या वतीने वकीलपत्र दाखल केल्याचा तकार दाखल केली. त्यामध्ये बापट ही व्यक्ती वकील नसतांनाही त्यांनी सन २००१ साला पासून वेगवेगळ्या न्यायालयात व उच्च न्यायालयात वकील म्हणून काम पाहत असल्याचे नमूद केले होते. नवसरे यांच्या अर्जावर न्यायालयाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना बापट यांच्या वकिलीची सनद व सनद मिळण्यासाठी दाखल केलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळण्यासाठी दि. २४ ऑक्टोबर २०१८ रोजी आदेश दिले होते.

त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जतचे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण व तपासी अधिकारी एस. पी. माने यांनी चौकशी करून न्यायालयात अहवाल सादर केला होता. त्या अहवालावर आज, शुक्रवारी न्यायालयात सुनावणी होऊन बापट याने मिळवलेली वकिलीची सनद व त्या संदर्भात दिलेली कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. न्यायालयाने नवसरे यांचे वकील वाय. जी. सूर्यवंशी व जे. डी. पिसाळ तसेच सरकारी वकील ढगे यांचा युक्तिवाद ग्राह्य़ धरून कर्जतच्या पोलीस निरीक्षकांना मंगलेश बापट याच्याविरुद्ध वकिलीची बनावट सनद व खोटी कागदपत्रे तयार करून लोकांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

Story img Loader