सातारा : राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करत त्यांच्याकडून एक कोटी खंडणी घेताना शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या महिलेला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या या महिलेला एक कोटी रुपयांची खंडणी घेताना शुक्रवारी सातारा गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली होती. तिला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात महिलेबरोबर आणखी कोण कोण सहभागी आहेत याचा तपास करायचा आहे.
हे प्रकरण काय आहे याचा तपास करायचा आहे. याच्यातून नवीन काही माहिती मिळते आहे का ते पाहायचं आहे. महिलेच्या आवाजाचे आणि तिच्या सह्यांचे नमुने तपासण्यासाठी घ्यायचे आहेत, असे सरकारी वकिलांनी पोलिसांच्या वतीने जिल्हा न्यायालयात न्या. एम. बी. पठाण यांना सांगितले. पोलिसांनी महिलेला सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने तिला तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली.
याबाबत महिलेचे वकील ॲड नितीन गोडसे यांनी न्यायालयाला सांगितले की, या महिलेमध्ये आणि जयकुमार गोरेमध्ये काहीतरी वाद सुरू आहे. ते आपल्या राजकीय बळाचा वापर करून संबंधित महिलेला या प्रकरणात अडकवले असल्याचा युक्तिवाद केला.