Prashant Koratkar Police Remand : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणारा, इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना अश्लिल शिवीगाळ करून त्यांना धमकावणारा तथाकथित पत्रकार आरोपी प्रशांत कोरटकरला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आज कोल्हापूरच्या सेशन कोर्टात याप्रकरणी सुनावणी पार पडली. त्यानंतर वकील असिम सरोदे यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधताना सुनावणीदरम्यान काय घडलं याची माहिती दिली आहे.

असिम सरोदे म्हणाले, प्रशांत कोरटकरला तात्पुरत्या अटकेपासून संरक्षण होतं. पण सेशन कोर्टाने अटकेपासून संरक्षणाचा आदेश रद्द केला होता. त्यानंतर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे की ज्या ज्या कोर्टात त्यांनी अटकेपासून संरक्षण मिळण्याकरता अर्ज केले आहेत, तेथे आरोपी हजर होता, असं समजायचं. पण प्रशांत कोरटकर फरार होता, हे सातत्याने पोलिसांकडून सांगण्यात येतंय.”

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी मदत केली

“त्यांचं दुसरं म्हणणं आहे की कोरटकरने नागपूर पोलिसांना पत्र लिहिलं होतं की माझे व्हॉइस सॅम्पल घ्यायचे तर घ्या. प्रशांत कोरटकरचा काही ठाव-ठिकाणा नव्हता, त्याचा पत्ता नव्हता, मग पोलिसांनी त्याच्याशी संपर्क कसा साधायचा? त्यांचे युक्तीवाद कमजोर आहेत. पोलिसांनी रिमांडची कारणं देताना सांगितलं की, तो पाच-सहा शहरांमध्ये लपून बसला होता. मध्य प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्रात तो होता. चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयासमोर धीरज चौधरीने त्याची व्यवस्था केली होती. धीरज चौधरी बुकी आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी त्याची व्यवस्था केली होती”, अंसही असिम सरोदे म्हणाले.

टोल नाक्यावरचे सीसीटीव्ही फुटेज चेक करावे लागतील

“प्रशांत कोरटकर सहा ठिकाणी राहिला आहे. या सहा ठिकाणी त्यांची व्यवस्था कोणी केली? त्याच्याकडे एक कारही होती. सहा ठिकाणी दोन पेक्षा जास्त कारने फिरला असेल. प्रवास करताना टोल क्रॉस केला असेल. त्यामुळे त्याच्याबरोबर अजून कोण होतं, हे पाहण्याकरता पोलिसांना तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासावे लागणार आहेत. गुन्ह्याला प्रोत्साहन देणारे लोक त्याच्याबरोबर आहेत, त्यामुळे त्यांच्यावरही वेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल झाला पाहिजे”, अशी मागणी वकील असिम सरोदे यांनी दिली.