रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयावर तब्बल १२ वर्षांपूर्वी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज फडकवणाऱ्या युवादलाच्या तीन कार्यकर्त्यांची प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी श्रीमती आर.आर. लोहिया यांच्या न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी सुटका केली आहे. तब्बल १२ वर्षांनी संशयाचा लाभ देवून त्यांची निर्दोष सुटका केली. राष्ट्रप्रेमी युवादलाचे संस्थापक अध्यक्ष बाबा मेंढे, रमेश कळंबे आणि दिलीप छत्तानी, अशी सुटका झालेल्यांनी नावे आहेत.
सरकारी पक्षानुसार जानेवारी २००१मध्ये सकाळी ११ वाजता बाबा मेंढे २०-२५ कार्यकर्त्यांना घेवून टाटा सुमो आणि मारोती व्हॅनमधून रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिराच्या आवारात दाखल झाले होते. त्याचवेळी कार्यालयाचे व्यवस्थापक सुनील शेषराव कथले यांनी त्या कार्यकर्त्यांना रोखले असता, त्यांनी कथले यांना आम्हाला डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळावर श्रद्धांजली वाहायची आहे, असे सांगितले होते. प्रवेशद्वारातून स्मृती मंदिराच्या आत प्रवेश घेतल्यानंतर लागलीच या कार्यकर्त्यांनी ‘पहिले तिरंगा, बाद मे रंगबिरंगा’, ‘पहले राष्ट्रध्वज फिर सभी ध्वज’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली आणि राष्ट्रध्वज फडकावला. राष्ट्रध्वज फडकावत असताना त्यांना स्वयंसेवकांनी रोखण्याचा प्रयत्न केला असताना दोन्ही गटांत हाणामारी होऊन दंगलसदृश्य वातावरण निर्माण झाले. कथले यांच्या तक्रारीवरून बाबा मेंढे, रमेश कळंबे आणि दिलीप छत्तानी यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. उर्वरित कार्यकर्ते फरारी झाले होते. पोलीस हवालदार वामनराव जाधव यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयात आरोपींच्या बाजूने अ‍ॅड. एस.के. मोहिले, अ‍ॅड. एस.ए. जामकर यांनी काम पाहिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा