नयना पुजारी बलात्कार व खून खटला
नयना पुजारी खून खटल्यात साक्ष देताना साक्षीदाराला तुम्ही खोटे बोलत असल्याचे वारंवार म्हणत पेचात पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या वकिलास  न्यायालयाने व साक्षीदाराने खडेबोल सुनावले. ‘खरे आणि खोटे काय आहे, हे ठरविण्याचा अधिकार न्यायालयास आहे. तुम्ही तुमची वर्तवणूक योग्य ठेवा’ अशी तंबी न्यायालयाने दिली. तर साक्षीदाराने ‘आपण खरंच बोलत आहे. तुम्ही तुमच्या आरोपीला सत्य काय ते विचारा’ असे खडे बोल सुनावले.
नयना पुजारी बलात्कार व खून खटल्याची सुनावणी मुख्य जिल्हा न्यायाधीश अनंत बदर यांच्यासमोर सुरू आहे. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून हर्षद निंबाळकर काम पहात आहेत.  
शुक्रवारी सकाळी नयना पुजारी यांचे कंपनीतील सहकारी अभिजित आराध्ये यांची उलटतपासणी आरोपी विश्वास कदम याचे वकील अ‍ॅड. बी अलूर यांनी घेतली. त्यानंतर याप्रकरणात वापरण्यात आलेल्या मोटारीचे मालक जयराम पंडित यांचीही सरपतापणी अ‍ॅड निंबाळकर यांनी घेतली.त्यानंतर उलटतपासणी झाली. पंडित यांनी सरतपासणीत सांगितले की, आपली इंडिका कार ही एका ट्रॅव्हल एजन्सीला भाडय़ाने दिली होती. त्यांनी ही कार सिनेक्रॅन कंपनीत कर्मचाऱ्यांना नेण्या-आणण्यासाठी लावली होती. या मोटारीवर विश्वास कदम याला चालक म्हणून ठेवले होते. १२ ऑक्टोबर २००९ रोजी कदम हा आपल्याकडे बापू भंडारी नावाच्या व्यक्तीला घेऊन आला.
आपण साताऱ्याला जाणार असून भंडारी हा कारवर चालक म्हणून काम करेल, असे त्यांने सांगितले. त्या रात्री आमच्या घरी राहून तो सकाळी उठून गेला. त्यानंतर १६ ऑक्टोंबर रोजी कदमची चौकशी करत पोलीस आमच्याकडे आले. दरम्यान आरोपीचे वकील अ‍ॅड. अलूर यांनी सरतपासणीला आक्षेप घेत जबाबाच्या वेगळे प्रश्न विचारू नका, असे म्हटले. त्यावेळी न्यायालयाने अ‍ॅड. अलुर यांना तुमची वर्तणूक योग्य ठेवा, अशी तंबी दिली. आपण सरतपासणी थांबवत नसल्याचे सांगत अ‍ॅड. अलूर उठून गेले.
पंडित यांची उलटतपासणी घेण्यास अ‍ॅड. अलुर यांनी सुरूवात केली. त्यावेळी पंडित यांनी एका प्रश्नाला उत्तर दिल्यानंतर तुम्ही खोटे बोलत असल्याचे अलूर म्हणाले. त्यावेळी न्यायालयाने खरे खोटे ठरविण्याचा अधिकार न्यायालयाचा असल्याचे त्यांना सांगितले.  
त्यानंतर तरीही अ‍ॅड. अलुर हे साक्षीदाराला तुम्ही खोटे बोलत असल्याचे म्हटल्यामुळे साक्षीदाराने चिडून ‘मी खरं बोलत आहे, तुम्ही तुमच्या आरोपीला सत्य काय ते विचारा’ असे सुनावले. या खटल्याची पुढील सुनावणी आता २० फेब्रुवारी रोजी होणार आहे.
फरारी योगेश राऊतची माहिती देण्यासाठी २५ हजारांचे बक्षीस जाहीर
नयना पुजारी हिच्यावर बलात्कार व खून प्रकरणातील मुख्य आरोपी योगेशची माहिती देणाऱ्याला पुणे पोलिसांकडून २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. राऊत पळून गेल्याच्या घटनेला आता दीड वर्ष उलटून गेले तरीही त्याचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नसल्यामुळे त्याला वगळून खटल्याचे कामकाम सुरू आहे.
खराडी येथील सॉफ्टवेअर कंपनीतील इंजिनिअर असलेली नयना पुजारी ही  ८ ऑक्टोबर २००९ रोजी काम संपवून घरी निघाली होती. चंदननगर येथील बस थांब्यावर उभी असताना तिला मोटारीत लिफ्ट देऊन तिच्यावर चौघांनी बलात्कार केला होता. त्यानंतर डोक्यात दगड घालून खून केला व राजगुरुनगरजवळील जंगलात मृतदेह टाकून दिला होता. याप्रकरणी पोलिसांनी योगेश राऊत, महेश ठाकूर, विश्वास कदम आणि राजेश चौधरी यांना अटक केली होती. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली. खटल्याच्या सुनावणीस सुरुवात झाल्यानंतर आरोपींपैकी राजेश चौधरी याला माफीचा साक्षीदार करण्यात आले व त्याचा कबुली जबाब नोंदवण्यात आला. मात्र, खटला सुरू झाल्यानंतर योगेश राऊत याला उपचारांसाठी ससून रुग्णालयात नेले असता १७ सप्टेंबर २०१० रोजी तो पळून गेला. चौधरी हा या गुन्ह्य़ातील मुख्य आरोपी असल्यामुळे त्याला पकडण्यासाठी मुदत देण्यात आली.  त्यामुळे खटला लांबत गेला. शेवटी राऊत न सापडल्यामुळे न्यायालयाने त्याला फरार घोषित करून त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले. मात्र, त्याच्या नावावर संपत्ती नसल्याचे आढळून आले. त्यामुळे राऊतला वगळून खटला सुरू करण्यात आला. खटला सुरू झाल्यानंतर माफीचा साक्षीदार चौधरीने आपल्याला आरोपी करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. ती मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.  
राऊत हा फरार झाल्यापासून पोलीस यंत्रणा त्याचा कसून तपास करत आहेत. मात्र, त्याचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही. त्याता तपास करण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखे कडून विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. राऊत हा मोबाईलचा वापर करत नाही. त्याचबरोबर त्याने कुटुंबाशी संपर्क साधलेला नाही. त्यामुळे त्याला शोधण्यात अडचणी येत आहेत. मात्र, पोलीस योगेश राऊतच्या नातेवाईक, पत्नी, आई-वडील यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. तरीही राऊत मिळत नसल्यामुळे त्याची माहिती देणाऱ्याला २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.