सोलापूर : उन्हाळ्याचे चटके बसत असताना विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या ऊसतोड मजुरांच्या टोळीतील चुलती आणि पुतणी या दोघींचा विहिरीत पाय घसरून पडल्याने, पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी जवळील मादन हिप्परगा येथे ही दुर्घटना घडली.

राजश्री दयानंद नागेनवरू (वय २१) आणि तिची पुतणी लक्ष्मी संजय नागेनवरू (वय १२, रा. बरडोल, ता. चडचण, जि. विजापूर, कर्नाटक) अशी मृतांची नावे आहेत. मृत राजश्री नागेनवरू एका ऊसतोड मजुरांच्या टोळीसोबत मादन हिप्परगा शिवारात सिध्दलिंग शांतप्पा फुलारी यांच्या शेतात ऊस तोडणी करण्यासाठी आल्या होत्या. दुपारी उन्हाचे चटके बसत असताना तहान लागल्याने राजश्री व त्यांची पुतणी लक्ष्मी दोघीही विहिरीवर गेल्या होत्या. परंतु विहिरीत उतरल्यानंतर अचानकपणे पाय घसरल्याने दोघीही विहिरीत पडून पाण्यात बुडाल्या. अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

Story img Loader