संदीप आचार्य

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजन उपलब्धतेचा विचार करून साधारणपणे ३० हजार रुग्णसंख्या झाल्यास करोना आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ कडक टाळेबंदी जाहीर केली पाहिजे, अशी सुस्पष्ट भूमिका राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी मांडली आहे. याबाबत तज्ज्ञांच्या माध्यमातून सखोल अभ्यास करून लवकरच अंतिम धोरण निश्चित केले जाणार असल्याचे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या दृष्टीने राज्य कृती दलाचे डॉक्टर, आयसीएमआरचे तज्ज्ञ तसेच मुख्य सचिव सिताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास आदींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत लोकल प्रवासाला परवानगी, हॉटेलची वेळ याशिवाय प्रमुख चर्चा झाली ती तिसऱ्या लाटेचा सामना करताना वैद्यकीय अंगाने कोणकोणती काळजी घेतली पाहिजे याची. यावेळी आयसीएमआरच्या अभ्यासगटातील मुकेश मेहता यांनी राज्याची आरोग्य व्यवस्था व करोना उपचारातील त्रुटींवर नेमके बोट ठेवले. तसेच तिसरी लाट अडविण्यासाठी करायच्या उपाययोजनांवर मेहता, डॉ शशांक जोशी, डॉ संजय ओक आदींनी आपली भूमिका मांडली.

यानंतर मुख्य सचिव सिताराम कुंटे म्हणाले, तिसऱ्या लाटेविषयी वैद्यकीय तज्ज्ञ वेगवेगळे अंदाज बांधत आहेत, मात्र दुसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजनचा वापर हा कळीचा मुद्दा ठरला होता. त्यामुळे यापुढे ऑक्सिजनची उपलब्धता आणि रुग्णसंख्या यांचे गणित निश्चित करून तात्काळ टाळेबंदीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. अर्थव्यवस्था व दैनंदिन व्यवहाराला गती द्यावीच लागेल, मात्र करोनाची लाट आल्यास कोणताही उशीर वा चर्चेत वेळ न घालविता तात्काळ टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. हा निर्णय घेताना राज्यात उपलब्ध असलेला ऑक्सिजनचा साठा नेमका किती रुग्णसंख्येला पुरणार आहे व किती रुग्णसंख्या झाल्यावर टाळेबंदी जाहीर करायची हे निश्चित करावे लागेल असे सिताराम कुंटे यांनी सांगितले. याबाबत त्यांनी एक उदाहरण सांगितले. कुंटे म्हणाले, समुद्रात मोठी लाट आल्यास आपण खाली बसून श्वास रोखून धरतो व लाट गेल्यानंतर पाण्यावर येऊन पुन्हा श्वास घेतो. करोनाचा सामना आपल्याला आता नेमके असेच करावे लागणार असल्याचे मुख्य सचिव कुंटे म्हणाले.

राज्यात आजघडीला केवळ १३०० मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होत असून दुसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजन मिळविण्यासाठी रात्र रात्र जागून प्रयत्न करावे लागले होते. त्या आठवणीही अंगावर काटा आणणाऱ्या आहेत, असे सांगून कुंटे म्हणाले, विमानातून रिकामे टँकर पाठवून रेल्वेच्या माध्यमातून भरलेले ऑक्सिजनचे टँकर आणण्याची कसरत अत्यंत कठीण होती. आता ती परत करावी लागू नये हीच आमची इच्छा आहे. यासाठी काही ठोस पावले व निर्णय आताच घ्यावे लागतील. साधारणपणे १००० रुग्णांसाठी २० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता लागते. आज राज्यात उपलब्ध असलेल्या ऑक्सिजन साठ्याचा विचार करता ५० हजार रुग्णांना आपण ऑक्सिजन देऊ शकतो. मात्र त्यानंतर आपल्याला अन्य राज्यातून ऑक्सिजन आणावा लागेल. तिसऱ्या लाटेत अन्य राज्यांची नेमकी परिस्थिती काय असेल ते आपण सांगू शकत नाही. यासाठी साधारण ३० हजार रुग्णसंख्या होताच कठोर टाळेबंदी करून करोनाची लाट रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल, अशी भूमिका मुख्य सचिवांनी मांडल्याचे या बैठकीत उपस्थित असलेल्या सूत्रांनी सांगितले.

मुख्य सचिवांच्या या सादरीकरणाला सर्वच उपस्थित तज्ज्ञांनी साथ दिली. यानंतर तज्ज्ञांच्या कृतीगटाने नेमका ऑक्सिजन साठा व रुग्णसंख्येचे गणित निश्चित करून किती रुग्णसंख्या झाल्यानंतर टाळेबंदी लागू केली पाहिजे त्याची शिफारस करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुळात लाट रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे व त्यानंतरही लाट आल्यास ऑक्सिजन साठ्याचा विचार करून कडक टाळेबंदी ठराविक काळासाठी करण्याचे धोरण मुख्यमंत्री उद्धव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कृतीदलाच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. यावेळी मुख्यसचिव सिताराम कुंटे यांनी आणखी एक महत्वाचा मांडलेला मुद्दाही सर्वांनी मान्य केला. कुंटे म्हणाले, दुसऱ्या लाटेत टाळेबंदीचा निर्णय घ्यायला थोडा वेळ लागल्याने रुग्णसंख्या वाढली होती, त्यामुळे तिसऱ्या लाटेत टाळेबंदी लागू करण्याबाबत ऑक्सिजन उपलब्धतेशी सलग्न सूत्र निश्चित झाल्यानंतर विनाकारण सल्लामसलत न करता टाळेबंदी जाहीर केली जावी.

राज्यातील व मुंबईमधील करोना रुग्णसंख्या आटोक्यात आली असली तरी रुग्ण शोध व रुग्ण संपर्कातील व्यक्तींचा कठोरपणे शोध घेणे व लसीकरणाचा वेग वाढविल्यास तिसरी लाट आपण लांबवू शकतो असे डॉ शशांक जोशी यांनी सांगितले. राज्याचे करोना विषय मुख्य सल्लागार डॉ सुभाष साळुंखे म्हणाले तिसरी लाट रोखण्यासाठी प्रत्येक जिल्हा व तालुक्यात तापाचे, सारी व इन्फ्लुएंझा रुग्णांचा शोध घेणे अत्यावश्यक करणे गरजेचे आहे. आरोग्य व महापालिकेने व्यापक सर्वेक्षण रोजच्या रोज करून त्याचा आढावा घेतला पाहिजे. यातील निष्कर्षानुसार क्लस्टर विभाग निश्चित करून तेथे आवश्यक ते निर्बंध घालणे व तात्काळ उपाययोजना केल्या पाहिजेत. खासकरून विदर्भात आज जरी रुग्णसंख्या कमी दिसत असली तरी तेथील काही जिल्ह्यांमध्ये सातत्याने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. यातूनच तिसऱ्या लाटेची कल्पना आधीच मिळून लाट रोखण्यासाठी योग्य ती पावले उचलता येतील. डॉ सुभाष साळुंखे हे मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत मात्र मुख्य सचिव कुंटे यांनी सादर केलेला ऑक्सिजनसाठा आधारित टाळेबंदी योजना योग्य असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid 19 chief secretary sitaram kunte cm uddhav thackeray task force maharashtra lockdown sgy