करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसलेला महाराष्ट्र सध्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या दृष्टीने तयारी करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच आरोग्य विभागाने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी करण्याचे आदेशही दिले आहेत. तसंच तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची भीती असल्याने त्यादृष्टीने तयारी केली जात आहे. यावेळी ही तिसरी लाट नेमकी कधी येणार यावरुन सध्या अनेक शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान महाराष्ट्रात पुढील दोन ते चार आठवड्यात करोनाची तिसरी लाट येईल असं कधीच सांगितलं नसल्याचं टास्क फोर्सने म्हटलं आहे.
महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर राहुल पंडित यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत, महाराष्ट्रात पुढील दोन ते चार आठवड्यात तिसरी लाट येण्यासंबंधीचा कोणताही इशारा नसल्याचं सांगितलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी तिसरी लाट लवकर आल्यास आपण तयार असलं पाहिजे असंही म्हटलं आहे.
दोन ते तीन आठवड्यात करोनाची तिसरी लाट येत असल्याचं सांगून तुम्ही लोकांना घाबरवत आहात का? तुमच्याकडे पुरावे आहेत का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “आम्ही लोकांना घाबरवण्याचा अजिबात प्रयत्न करत नाही आहोत. मी हे योग्य पद्धतीने मांडतो. आमच्यात करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तयारीसंबंधी चर्चा झाली. आतापर्यंतच्या मॉडेलनुसार, दोन लाटांमध्ये १०० ते १२० दिवसांचं अंतर असतं. पण हे फक्त मॉडेल असून आपल्याला खरी परिस्थिती पहावी लागते”.
अंदाज लावणं कठीण
“अमेरिकेसारख्या देशात दोन लाटांमध्ये १४ ते १५ आठवड्यांचं अंतर आहे. पण युकेमध्ये आठ आठड्यांपेक्षा कमी अंतर आहे. आपल्याकडे डेल्टा विषाणू असल्याने तयारीत राहण्याची गरज आहे. आम्ही कधीही दोन ते चार आठवड्यात करोनाची तिसरी लाट येणार असल्याचं म्हटलेलं नाही. असा अंदाज लावणं कठीण आहे,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.
पुढे त्यांनी सांगितलं की, “आम्हाला मॉडेलप्रमाणे पुढे जात जगभरातील इतर देशांचा अभ्यास करुन इतर लाटा कशा असतील याचा अंदाज घ्यावा लागणार आहे. यासंबंधीच पूर्ण चर्चा झाली होती. लाट लवकर आल्यास आपण तयारीत राहिलं पाहिजे इतकीच चर्चा झाली असून त्यापेक्षा अधिक काही नाही”.
यावेळी त्यांना मुंबईत ठिकठिकाणी लोक गर्दी करत असून सुरक्षेच्या नियमांचं पालन करत नसल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “तिसऱ्या लाटेसाटी कोणतीही अशी वेळमर्यादा नाही. मात्र आपण सर्वांना करोनासंबंधित सुरक्षेच्या नियमांचं पालन केलं पाहिजे. आपण अर्थव्यवस्था सुरु होऊ देता कामा नये असं माझं म्हणणं नाही. पण लोकांनी घराबाहेर पडताना डबल मास्क वापरला पाहिजे”.