राज्यातील करोना संसर्ग पुन्हा एकदा हळूहळू वाढताना दिसत आहे, या पार्श्वभूमीवर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. याशिवाय आषाढी वारी संदर्भात देखील चर्चा झाली. या संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना माहिती दिली.

राजेश टोपे म्हणाले, “राज्य मंत्रीमंडळ बैठकीत आम्ही नेहमीच कोविडबाबत अतिशय सविस्तर अशी माहिती सादर करत असतो, त्याप्रमाणे आज देखील करण्यात आली. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्ये आपल्याला नक्कीच पॉझिटिव्हीटी वाढल्याचं सांगण्यात आलेलं आहे. त्यामळे पॉझिटिव्हीटी वाढल्या कारणाने चाचण्याचं प्रमाण वाढवण्याच्या सूचना आज कडक पद्धतीने देण्यात आलेल्या आहेत. काल रविवार असल्याने तपासण्या कमी झाल्या परंतु आजपासून हे प्रमाण वाढवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.”

तसेच, “पॉझिटिव्हिटी रेट्स हा नक्कीच या जिल्ह्यांमध्ये खूप जास्त झाल्याचं चित्र पाहायला मिळतय. आठ, सहा, पाच, तीन टक्के असा पॉझिटिव्हिटी रेट आहे. म्हणजे १०० तपासण्यांमागे एवढे पॉझिटीव्ह आढळत आहेत. ही जरी या पाच-सहा जिल्ह्यांपुरती वस्तूस्थिती असली, परंतु या संपूर्ण परिस्थितीत रुग्णलयात भरतीचे प्रमाण जर पाहिले तर साधारणपणे एकुण पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांपैकी एक टक्का आहे. फार काळजी करण्याचं असं काम नाही.” असं टोपेंनी सांगितलं.

याचबरोबर, “मास्कबाबत आम्ही सगळ्यांना सांगितलं आहे की, हा मास्क सगळ्यांनी जरी सक्ती नसली तरी आवाहन केलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी व्हावी, या दृष्टिकोनाइतपत मास्क सक्तीच्या संदर्भाने, म्हणजे दंड लावू नये परंतु तो घातला पाहिजे आणि नाही घातला तर तसं सांगितलं पाहिजे की मास्क वापरा, यानुसार चर्चा झालेली आहे.” असही टोपेंनी सांगितलं.

याशिवाय, “आषाढी वारीबाबत देखील चर्चा झाली. दिंडीद्वारे जवळपास दहा-पंधरा लाख लोक एकत्र जमणार आहेत. अशा परिस्थिती काळजी घेऊन दिंडी पूर्ण करावी, अशा पद्धतीची एक प्रामुख्याने चर्चा झालेली आहे. वारी होईल त्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही.” अशी माहिती देखील आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली.

Story img Loader