राज्यात पुन्हा एकदा करोना संसर्ग वाढीस लागला आहे. आज दिवसभरात राज्यात पाच हजारांपेक्षाही जास्त नवीन करोना रूग्ण आढळून आले आहेत. राज्य सरकारने सावधगिरीच्या दृष्टीने निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. आज टास्क फोर्सची देखील बैठक पार पडली. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.
आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, “राज्यात आज ५ हजार ३६८ हे आजच पॉझिटिव्ह रूग्ण आढळलेले आहेत. काल ३ हजार ९०० होते आणि आज जवळपास साडेपाच हजार आढळले आहेत. मुंबईत काल साधारण २२०० च्या दरम्या होते, आज चार हजाराच्या दरम्यान आढळले आहेत. जवळजवळ एक दिवसाआड म्हणजे दोन दिवसात दुप्पट संख्या होत आहे. मुंबईची आजची दिवसभरातील जी पॉझिटिव्हिटी आहे ती ८.४८ टक्के आहे, ठाण्याची देखील आजची पॉझिटिव्हीटी ५.२५ टक्के आहे. रायगडची ४ टक्के आहे. पालघरची ३ टक्के आहे आणि पुण्याची ४.१४ टक्के आहे. याचा अर्थ असा आहे की साधारण १०० तपासण्या केल्या तर त्यामध्ये अशा स्वरूपात पॉझिटिव्ह रूग्ण आढळत आहेत.”
तसेच, “त्यामळे निश्चितप्रकारे जे एक दिवसाआड दुप्पट होण्याची जी परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळत आहे, तो नक्कीच थोडी चिंता वाढवणार विषय आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्स आणि सर्वांनी जी काही चर्चा केली. त्यामध्ये काय उपाय करावे किंवा निर्बंध या निमित्त करणे गरजेचे आहेत. या सगळ्या संदर्भात खूप सविस्तर चर्चा झालेली आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. तो आज उद्यामध्येच घ्यावा लागेल. त्या संदर्भात जी चर्चेतील मुद्दे आहेत, त्या मुद्य्यांवरून तो निर्णय घेतल्या जाण्याच्या दृष्टीकोनातू कार्यवाही होईल.”
…तर महाराष्ट्रात लॉकडाउन लावावा लागेल; ठाकरे सरकारमधील मंत्र्याचं मोठं विधान
याचबरोबर, “हे नक्कीच आहे की कुठेही ज्या ठिकाणी हॉल्स आहेत, गर्दी आहे त्या ठिकाणी गर्दी टाळलीच पाहिजे आणि गर्दी नकोच हाच एक सूर सर्वसाधरणपणे आहे. तो नको कारण त्यामुळेच संक्रमण अधिक झपाट्याने वाढले हे सर्वसाधरणपणे सर्वांचं मत आहे आणि त्या दृष्टीकोनातून योग्य तो निर्णय घेण्याचा निर्णय होऊ शकेल.” याशिवाय, “दुसरा महत्वाचा विषय असा आहे की, साधारणपणे आता चाचण्या कशा कराव्यात? तर चाचण्यांच्या संदर्भात एसजीटीएफ हे जे कीट आहे ते मोठ्यासंख्येने आपण या दहा-पंधरा दिवसात वापरावं आणि आज जे पॉझिटिव्ह येत आहेत, त्यामध्ये डेल्टा किती आणि ओमायक्रॉन किती याचं अचूक निदान हे या एसजीटीएफ कीटच्या माध्यमातून होऊ शकले.” असंही आरोग्यमंत्री टोपेंनी यावेळी बोलून दाखवलं.