राज्यातील करोना रुग्णसंख्या वाढत असून लोकांकडून नियमांचं पालन केलं जात नसल्याने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली आहे. आपल्याकडे जर सहजासहजी गोष्टी घेतल्या तर याची किमंत संख्यात्मक वाढ होऊन चुकवावी लागेल असं सांगत राजेश टोपे यांनी निर्बंध अजून कडक केले जाऊ शकतात असा इशारा दिला आहे. लसीकरणातही आपण थोडे मागे असून ते योग्य नाही सांगत त्यांनी ही टक्केवारी वाढवण्यासाठी आवाहन केलं आहे. १०० टक्के लसीकरणाचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मागील आठ दिवसात पाहिलं तर २० डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रात पाच ते सहा दरम्यान अॅक्टिव्ह रुग्ण होते, पण आता महाराष्ट्रात ११ हजार ४९२ रुग्ण आहेत. २० हजारांपर्यंत हा आकडा जाऊ शकतो. मुंबईची तुलना केली तर मुंबईत ३०० च्या आसपास केसेस होत्या, आज १३०० केसेस आहेत. आज संध्याकाळी रिपोर्ट होतील त्यातून अंदाजे २२०० केसेस रिपोर्ट होतील. सात दिवसात सात पटीने रुग्ण वाढले आहेत. दोन दिवसात डबलिंग होत आहे अशी परिस्थिती आहे,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

“रोज अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या जी नोंदवली जात होती ती ४०० ते ६०० असायची. पण आज २००० च्या पुढे पॉझिटिव्ह रुग्ण आढळतील अशी परिस्थिती आहे. मुंबईत रोज ५१ हजार चाचण्या केल्या जात आहे. त्यातून २२०० पॉझिटिव्ह येत असतील चार टक्के पॉझिटिव्हीटी रेट आहे जो चांगला नाही. त्यामुळे आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे,” असा इशारा राजेश टोपे यांनी दिला.

Covid: डबलिंग रेट वाढल्याने राजेश टोपेंनी व्यक्त केली भीती, म्हणाले “गती जर अशीच वाढत गेली तर…”

“दिल्लीत बऱ्यापैकी निर्बंध वाढवण्यात आले आहेत. जुने सर्व निर्बंध त्यांनी आणले आहेत. मॉल्स, रेस्तराँ, लग्न सर्वांवर निर्बंध लावले आहेत. आपल्याकडे जर आपण सहजासहजी गोष्टी घेतल्या तर याची किमंत संख्यात्मक वाढ होऊन चुकवावी लागेल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत करोनाचे नियम कठोरपणे पाळावे लागतील. पण जर आपण नियम पाळणारच नसू तर निर्बंधांमध्ये काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

पडळकर म्हणाले “तुम्ही खाली बसा, तुम्ही काय मंत्री आहे का?”, त्यानंतर राजेश टोपेंनी दिलं उत्तर; म्हणाले…

पुढे त्यांनी सांगितलं की, “मुख्यमंत्री, टास्क फोर्स आणि आरोग्य विभाग यासंबंधी एकत्रितपणे निर्णय घेईल. मुख्यमंत्र्यांनी कालच्या बैठकीत टास्क फोर्सची बैठक घेऊन वाढत असलेला पॉझिटिव्हिटी रेट, रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासंबंधी सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांसोबत आज किंवा उद्या बैठक होणार असून निर्बंध अजून वाढवण्यासंबंधी निर्णय घेतला जाऊ शकतो. यासाठी टास्क फोर्सचं मत विचारात घेतलं जाईल”.

तूर्त रात्रीची जमावबंदी; उपाहारगृहे, सभा-समारंभ, विवाह सोहळ्यांमधील उपस्थितीवर निर्बंध

“लग्न किंवा मोठ्या कार्यक्रमांमध्ये नियम न पाळता पार पडत आहेत. त्यामुळे पोलीस आणि प्रशासनाला यावर बंधनं आणावी लागतील,” असं राजेश टोपे म्हणाले आहेत. “ओमायक्रॉनचे १६७ रुग्ण असून त्यातील ९१ जण बरे झाले असून डिस्चार्ज मिळाला ही जमेची बाजू आहे. कोणाचाही मृत्यू झालेला नाही. पण करोनाचे वेगवेगळे व्हेरियंट जास्त चिंतेता विषय आहे,” असं त्यांनी सांगितलं.

“लसीकरणाचा दिवसाचा रेट ८ लाखांहून ५ लाखांवर आला असून हे भूषणावह नाही. मंत्रिमंडळ बैठकीत यासंबंधी चर्चा झाली. त्यामुळे सर्वपक्षीय स्थानिक नेते, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संघटना यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि जी नकारात्मक मानसिकता आहे ती सकारात्मक करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. लसीकरणात आपण थोडे मागे असून हे योग्य नाही. आपल्याला १०० टक्के लसीकरण करायचं आहे,” असं आवाहन राजेश टोपे यांनी यावेळी केलं.

“महाराष्ट्रात आतापर्यंत १३ कोटी २१ लाख ९० हजार ३७३ लोकांचं लसीकरण झालं आहे. पहिला डोस जवळपास ८ कोटी लोक म्हणजेच ८७ टक्के लोकांनी घेतला आहे. दुसरा डोस ५७ टक्के झालं आहे,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. ओमायक्रॉनसंबंधी जे प्रोटोकॉल सांगितले आहेत त्याचे नियम पाळले जात आहेत.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ ते १८ वयोगटातील शाळकरी विद्यार्थ्यांना लस देण्यासंबंधी घोषणा केली असून त्यासंबंधी आम्ही तयारीत आहोत. कोव्हॅक्सिनच देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. वेगळी व्यवस्था करण्याची सूचना असून प्रत्येकाला बोलवणं कठीण असून शाळेत जाऊन करता येऊ शकतं का याबाबतही नियोजन सुरु आहे. व्याधी असणारे, ६० वयाच्या पुढील नागरिक, आरोग्य तसंच पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देण्याचा जो निर्णय झाला आहे त्याबाबत कोणती लस द्यायची याबाबत कोणताही निर्णय़ कळवलेला नाही. आम्ही वाट पाहत आहोत,” अशी माहिती त्यांनी दिली.

राज्यात सध्या काय निर्बंध आहेत ?

करोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव यामुळे गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात काही नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

विवाहसोहळे, धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांमध्ये उपस्थितीवर नियंत्रण आणण्यात आले आहे. उपाहारगृहे, चित्रपट व नाट्यगृहे, व्यायामाशाळांमध्ये ५० टक्के उपस्थितीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. नाताळ, नववर्ष समारंभ साजरे करताना गर्दी होऊ नये यासाठीच ही खबरदारी घेण्यात आली आहे. नवे निर्बंध शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. या कालावधीत पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र बाहेर पडता येणार नाही वा एकत्र जमता येणार नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid omicron health minister rajesh tope restriction in maharashtra sgy
Show comments