Maharashtra School Reopen: राज्यातील करोनाची तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या २० दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते बारावी असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. तसंच निर्णयाचे अधिकार स्थानिक प्रशासनाकडे असतील असंही स्पष्ट केलं आहे. पालकांची समंती आवश्यक असून त्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोठी बातमी! राज्यातील शाळा सोमवारपासून सुरु?; वर्षा गायकवाड यांची महत्वाची माहिती

तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल तिथे स्थानिक पातळीवर निर्णयाचे अधिकार द्यावेत असा मुद्दा मांडण्यात आला. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे तसा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावात येत्या सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा विचार करावा असं सांगण्यात आलं आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

सरसकट शाळा बंदला शिक्षकांचा विरोध

वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, “२४ जानेवारीपासून शाळा सुरू होणार आहेत. जिथे रुग्णसंख्या कमी असेल तिथे शाळा सुरू होतील. बालवाडी ते बारावीचे सर्व वर्ग सुरू होणार असून शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये अशी आमची भूमिका आहे”.

“मुलांचं आरोग्य आणि मुलांची सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे स्थानिक स्थितीकडे लक्ष ठेवत वारंवार आढावा घेतला जावा आणि त्यानुसारच निर्णय घेतला जावा,” असं यावेळी वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. स्थानिक प्रशासनाने निर्णय घेताना तिथल्या परिस्थितीचा अंदाज घ्या असं सांगताना एक निर्णय घेतो म्हणून दुसऱ्याने घेतलाच पाहिजे असं नाही हे स्पष्ट केलं.

शाळेत जाऊन १५ ते १८ वयोगटातील मुलांचं लसीकरण करता येईल का हे आम्ही पाहत आहोत अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली असून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दोन डोस घेतलेले असावेत असं स्पष्ट केलं आहे.

करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निर्बंध शिथिल करताना राज्यात शाळा- महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यात आली होती. करोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना म्हणजेच लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येण्याची परवानगी देण्यात आली होती. तर शाळांमध्ये पात्र मुलांच्या लसीकरणावर भर देतानाच करोना नियमांचे काटेकोरपणे पालन करीत शाळा सुरू होत्या. मात्र ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागताच जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात शाळा आणि महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातून केवळ इयत्ता १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती.

मात्र गेल्या काही दिवसांपासून करोनाची स्थिती चिंताजनक नसल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वच स्तरांतून शाळा सुरू करण्याबाबत मागणी होऊ लागली होती. त्यामुळे सोमवारपासून शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून शाळा- महाविद्यालये सुरू करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला आहे.

महत्वाचं म्हणजे शाळा किंवा महाविद्यालय सुरू करताना स्थानिक करोना परिस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून स्थानिक प्राधिकरण निर्णय घेणार आहेत. त्याबाबत जिल्हाधिकारी किंवा पालिका आयुक्तांवर मुख्य जबाबदारी असेल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid omicron maharashtra government allows to open school sgy