चीनसह अन्य देशांत पुन्हा करोनाचा उद्रेक झाल्याने भारताची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर, लसीकरण पूर्ण करण्याबरोबरच अन्य उपाययोजना करण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिला आहे. या पार्श्वभूमीव आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील आरोग्य विभागासोबत बैठक घेतली आणि काही महत्त्वपूर्ण निर्देश दिले. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यींनी आरोग्य विभागाची, आरोग्य शिक्षण विभागाबरोबरच सर्वांची एकत्र बैठक घेतली. या बैठकीत काही निर्देश देण्यात आले आहेत. आरोग्य विभागाने मागील काही दिवासांमध्ये करोनाबाबत आलेल्या बातम्यांचं अवलोकन केलं, त्यामध्ये असं आढळून आलं की बीएफ 7 हा नवीन व्हेरीएंट आलेला आहे, जसा पहिले ओमायक्रॉन होता. तसा तो फार गंभीर वैगेरे असं काही नाही. पण भारतात अशाप्रकारचा किंबहूना महाराष्ट्रात तो व्हेरिएंट अद्याप महाराष्ट्रात तरी आढळलेला नाही. भारतात चार रूग्ण आहेत, त्यामध्ये गुजरात आणि ओरिसा यांचा समावेश असल्याचं लक्षात आलेलं आहे.”
याचबरोबर “काल मी आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. करोनासंदर्भात कार्यरत असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना सजग केलं, की अशाप्रकारचं वातावरण सध्या जगात सुरू आहे. आपल्या महाराष्ट्रातील जनतेने घाबरण्याचं काही कारण नाही. केवळ काळजी घेणं अपेक्षि आहे. कारण, येणाऱ्या बातम्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे हेही योग्य नाही. म्हणून काळजीपोटी जे ६० वर्षांवरील वृद्ध आहेत, आपण त्यांना दक्षता म्हणून जे डोस देणार होतो किंवा मधुमेहाच्या रुग्णांनी मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टंसिंग पाळणं अशाप्रकारचे निर्देश केंद्राकडून आलेले आहेत. ते आपण पाळावेत अशा प्रकारचं मार्गदर्शन आज आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे.” असंही सावंत यांनी सांगितलं.
याशिवाय “ओमायक्रॉनबाधित असेलला एक रूग्ण हा चार जणांवर परिणाम करत होता. मात्र या व्हेरिएंटचा वेग थोडा जास्त आहे, या व्हेरिएंटचा एक रूग्ण हा दहा जणांवर परिणाम करतो, अशी माहिती आहे. त्यामुळे आज जे काय मार्गदर्शन आम्हाला केलं गेलं. त्यामध्ये असं सूचित करण्यात आलेलं आहे की भीती नको पण काळजी घ्या. चीनमधील बीएफ 7 हा व्हेरिएंट पूर्वी भारतात आढळलेला आहे, त्यामुळे या व्हेरिएंटमुळे भीती बाळगण्याची गरज नसली, तरी आवश्यक दक्षता घेण्याची गरज आहे. कोविड अनुरुप काळजी आणि लसीकरण यावर भर द्यावा, मास्कची सक्ती नाही परंतु वरिष्ठ नागरिक आणि अतिजोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्तींनी गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हिताकारक आहे. पंचसूत्रीचा वापर, पूर्वीप्रमाणेच टेस्टिंग, ट्रॅकिंग, ट्रिटमेंट आणि वॅक्सीनेशन या पद्धतीच्या पंचसूत्रीचा अवलंब आपण केला पाहिजे. अशा पद्धतीचं मार्गदर्शक तत्व हे आजच्या मार्गदर्शनानंतर आणि कालही आम्ही आमच्या संपूर्ण विभागाला दिले आहेत.” अशी माहितीही यावेळी त्यांनी दिली.
“प्रयोगशाळा चाचण्या वाढवणे आणि आरटीपीसीआर चाचणीवर भर देणे, प्रत्येक जिल्ह्यातील मनपाने आपल्या तपासण्या वाढवाव्यात. प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये आरटीपीसीआरचे प्रमाण वाढवावे, १०० टक्के जनुकीय क्रमनिर्धारण तपासणी पाठवण्यात यावे, त्यामुळे नव्या व्हेरिएंटकडे लक्ष देणे शक्य होईल. कोविड प्रतिबंधक लसीकरण आणि बुस्टर डोसवर भर, रुग्णालयीन व्यवस्था सुसज्ज ठेवावी. मुष्यबळ प्रशिक्षण आणि क्षमता संवर्धन कोविड प्रतिबंध आणि नियंत्रण संदर्भात सर्वस्तरावर कार्यरत मनुष्यबळाचे नियोजन करण्याबाबत सर्वांना निर्देशित करणयात आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांचं थर्मिल टेस्टिंग करण्यात यावं अशा पद्धतीच्या सूचना करण्यात आल्या आहेत.” असं आरोग्यमंत्री सावंत यावेळी म्हणाले.