पंढरपूर : सध्या उन्हाचा पारा चाळिशीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. त्यामुळे पंखा, कुलर, एसी यांसारख्या उपकरणांच्या मदतीने उन्हाची दाहकता कमी करण्याचा उपाय प्रत्येक जण करीत आहे. प्रवास करताना उन्हाच्या या झळा कमी करण्यासाठीही वेगवेगळे उपाय योजले जातात. यामध्ये मोटारींमधील वातानुकूलन यंत्रणेचा सर्वत्र बोलबाला असतो. या पार्श्वभूमीवर येथील आयुर्वेदिक डॉ. रामहरी कदम यांनी आपल्या नव्या कोऱ्या मोटारीला चक्क शेण आणि गोमूत्राचा एकत्रित लेप लावला आहे. या प्रयोगानंतर वातानुकूलन यंत्रणेचा वापर न करताही कडक उन्हातदेखील मोटारीतील तापमान निम्म्यावर आले आहे. सध्या हा प्रयोग आणि शेण-गोमूत्राचा लेप लावलेली मोटार सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.
डॉ. कदम हे पंढरपूरचे रहिवासी आहेत. त्यांचा दवाखानाही पंढरपूरमध्येच आहे. परिसरातील तापमान ४० अंशांवर गेल्याने नागरिकांची तगमग सुरू झाली आहे. यातच धगधगत्या उन्हातून प्रवास करणे अवघड झाले आहे. मोटारीत वातानुकूलन यंत्रणा सुरू केल्याशिवाय प्रवास करणे अवघड बनले आहे. अनेकदा ही यंत्रणाही कुचकामी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या व्यवसायातून शेण आणि गोमूत्राच्या होणाऱ्या उपयोगातून त्याचाच लेप संपूर्ण मोटारीला लावल्यास काय परिणाम होईल, याचे कुतूहल डॉ. कदम यांच्या मनात चाळवले. याबाबत डॉ. कदम म्हणाले, की पूर्वी गावोगावी घरे, बांधकाम, पदार्थ साठवणाऱ्या वस्तूंना शेणाचा लेप लावला जाई. यातून त्या विशिष्ट जागेतील वाढत जाणारे तापमान रोखले जात होते. यातूनच जुन्या घरांमध्ये ऐन उन्हाळ्यातही आत प्रवेश केल्यावर थंडावा अनुभवण्यास येत असे. यातूनच मोटारीला देखील असा लेप लावण्याचे मनात आले.
डॉ. कदम यांनी देशी गाईचे शेण आणि गोमूत्र एकत्र केले. हे दोन्ही मिश्रण त्यांनी त्यांच्या मोटारीच्या पत्र्यावर लावले. त्यासाठी ५० किलो शेण आणि २५ लिटर गोमूत्राचा वापर केला. हा लेप लावल्यावर मोटारीतील तापमानात मोठी घट होत असल्याचे लक्षात आले. पंढरपूर परिसरात ४० अंश सेल्सिअस तापमान असताना त्यांना ते जाणवत नाही. हा अनुभव त्यांच्या सोबतच अन्य नागरिकांनीही घेतला.
मोठा पाऊस न झाल्यास हा लेप किमान चार ते पाच महिने टिकू शकतो, असे डॉ कदम यांचे म्हणणे आहे. शिवाय या लेपामुळे गाडीच्या रंगावर कोणताही दुष्परिणाम न होता उलट वाढत्या उन्हापासून त्या रंगाचेही संरक्षण होत असल्याचा दावा डॉ. कदम यांनी केला आहे. यापूर्वी डॉ. कदम यांनी दुचाकी वाहनाला असा लेप लावला. तसेच त्यांच्या राहत्या सिमेंटच्या घरालाही त्यांनी अशाच प्रकारे शेणा-गोमूत्राचा लेप लावला आहे. या प्रयोगानंतर त्यांच्या घरात आता त्यांना पंखाही लावण्याची गरज पडत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. डॉ. कदम यांचे हे प्रयोग आणि शेणाच्या लेपात रंगलेली मोटार सध्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. अनेक लोक त्यांची ही मोटार, घर पाहण्यासाठी येत आहेत.
मोटारीमध्ये उन्हाची तीव्रता ही त्यांच्या बांधणीत असलेल्या धातूच्या पत्र्यामुळे अधिक जाणवते. उन्हात मोटारीचा पत्रा तापतो आणि प्रवाशांना त्रास होऊ लागतो. या वाढत्या उष्णतेला रोधक ठरवण्याचे कामच या शेण-गोमूत्राच्या लेपाने केले आहे. माझ्या व्यवसायातून जाणवलेला हा प्रयोग होता. तो अगोदर माझे घर, दुचाकीवर केला. आता तोच मोटारीवर केला असून, यशस्वी झाला आहे.