जे गाय खरेदी करतील अशांना अनुदान देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू : पाटील
गोमूत्र कॅन्सरसारख्या रोगावर चांगले औषध असून वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या डिझेल व पेट्रोलमध्ये यांचे प्रमाण वापरल्यास प्रदूषण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबामध्ये एक तरी गाय जोपासण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. गायींची संख्या वाढण्यासाठी जे गाय खरेदी करतील अशा कुटुंबांना अनुदान देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू, अशी ग्वाही जिल्ह्यचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी जत तालुक्यात बालगाव आश्रमात दिली.
जत तालुक्यातील बालगाव येथे गो-सेवा समिती व गुरुदेव आश्रम बालगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गो- आराधना महोत्सव व गो-शाळा उद्घाटन समारंभ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. विलासराव जगताप, जिल्हा परिषद अध्यक्षा रेशमाक्का होर्तीकर, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे संसदीय सल्लागार राजू आलगूर, प्रांताधिकारी अशोक पाटील, शांतमल्लिकार्जुन स्वामीजी, महेशानंद स्वामीजी आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले, भारतीय संस्कृती फार पुरातन संस्कृती असून त्याचे जतन आणि संवर्धन केले पाहिजे. अशा संस्कृतींचे जतन आश्रमांच्या माध्यमातून होत आहे.
या आश्रमांना राजाश्रयाबरोबर लोकाश्रयाचीही अत्यंत गरज आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गायीला माता मानले जाते याचे कारण गाय ही केवल पशू नसून ते अनेकांचे श्रध्दास्थान आहे. त्यामुळे गायींचे जतन आणि संवर्धनाबरोबरच वृध्दी होणे गरजेचे आहे. असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, विज्ञानाच्या युगामध्ये गायीचे महत्त्वही फार वाढले आहे. यांचे कारण म्हणजे गोमूत्रावर संशोधन केल्यावर अनेक चांगल्या बाबी समोर आल्या आहेत.
आश्रमांनी केवळ, समाजामध्ये आध्यात्मिक ज्ञानदानाचे काम करणे यापर्यंत मर्यादित न राहता समाजातील बेरोजगारी कमी करण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण देण्यावर भर दिला पाहिजे.
बेरोजगारांना स्वताचा चरितार्थ चालविण्यासाठी व्यवसाय कौशल्य आत्मसात करणे ही आताच्या काळाची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी आश्रमांनी व्यावसायिक शिक्षणाचे अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर द्यावा.
व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करणाऱ्या आश्रमांच्या पाठिशी शासन उभे राहील, असेही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगून ते म्हणाले, दुष्काळावर मात करण्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीमध्ये मुरवणे आवश्यक आहे. तरच आपण दुष्काळावर मात करू शकणार आहे. यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियानावर अधिक भर दिला आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून अनेक कामे राज्यभर झाली आहेत. पावसाळ्यानंतर या कामांचे चांगले परिणाम समाजासमोर येतील असेही शेवटी ते म्हणाले.
प्रास्ताविकात श्री. अमृतानंद महास्वामी म्हणाले, गायीचे जतन व वृध्दी होण्यासाठी गुरुदेव आश्रमाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. सध्या या आश्रमात ५० गायींचे जतन करण्यासाठी गोठय़ाची उभारणी सुरू आहे.
गायीचे महत्त्व समाजात समजावे यासाठी आश्रमामार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहितीही त्यांनी या प्रसंगी दिली.
प्रारंभी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नवीन गायीच्या गोठय़ाचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जि. प. बांधकाम सभापती संजय सावंत, मकरंद देशपांडे, डॉ. रवींद्र आरळी, प्रकाश जमदाडे, सुनील पोतदार पंचक्रोशीतील नागरिक, भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Story img Loader