भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली असून, समविचारी पक्षांची आघाडी करून भाकप ३० ते ३५ जागा लढवणार आहे, अशी माहिती पक्षाचे राज्य सरचिटणीस भालचंद्र कानगो यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. नगर जिल्हय़ातील पारनेरची जागा लढवण्याचा निर्णय झाला असून, जिल्हा परिषदेचे सदस्य आझाद ठुबे यांच्या उपस्थितीत त्यांची उमेदवारीही कानगो यांनी लगेचच जाहीर केली.
केंद्रातील पूर्वीचे काँग्रेसप्रणीत यूपीए सरकार आणि आत्ताचे मोदी सरकार या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, मागच्या सरकारच्या पावलावर पाऊल टाकूनच मोदी सरकार मार्गक्रमण करीत आहे अशी टीका कानगो यांनी केली. ते म्हणाले, मागच्या सरकारच्या दरवाढीवर घणाघाती टीका करणारे मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मात्र त्यांचीच री ओढत आहेत. कठोर निर्णय घ्यावे लागतील अशी भावनिक हाकाटी देऊन महिनाभरातच त्यांनी भांडवलदारधार्जिणे रूप उघड केले आहे. मनमोहन सिंग यांच्या काळात वेगळे काय होत होते, असा सवाल त्यांनी केला.
राज्यातील आघाडी सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार या दोघांकडूनही जनहिताचे निर्णय होणार नाहीत असा दावा करून कानगो म्हणाले, विधानसभेची निवडणूक डोळय़ांसमोर ठेवून राज्य सरकारने आरक्षणाच्या नावाखाली मराठा आणि मुस्लिम समाजाची विशेषत: बेरोजगार युवकांची दिशाभूल केली आहे. केवळ निर्णय घेतला. त्याच्या अंमलबजावणीबाबत साशंकताच आहे. शिवाय एकीकडे नोकऱ्या कमी करायच्या आणि दुसरीकडे आरक्षण जाहीर करायचे, ही दिशाभूलच आहे. केवळ सवंग लोकप्रियतेसाठीच हे उद्योग सुरू आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या काळात राज्यात अनेक ठिकाणी गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र त्या वेळी आचारसंहितेचे कारण देऊन त्याकडे चक्क दुर्लक्ष करण्यात आले असा आरोप कानगो यांनी केला. ते म्हणाले, आता दुष्काळात तसे होऊ नये. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने तातडीने उपाययोजना सुरू करणे गरजेचे आहे. पक्षाचे जिल्हा सचिव दिलीप लांडे, सहसचिव रमेश नागवडे, आयटकचे सुधीर टोकेकर, शंकर न्यालपेल्ली आदी या वेळी उपस्थित होते.
समान पाणीवाटप
जायकवाडीच्या पाण्याबाबत प्रादेशिक वाद निर्माण होणार नाही या पद्धतीने नगर-नाशिक व मराठवाडा यातील पाण्याचे समान वाटप झाले पाहिजे, अशी मागणी कानगो यांनी केली. समान पाणीवाटपाचा आग्रह धरताना यातून विशिष्ट नेत्यांचेच हित सांभाळले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.  

Story img Loader