सोलापूर : सोलापुरात २०१९ साली  तब्बल ३० हजार असंघटित कामगारांच्या घरकुलांच्या भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केल्याबद्दल घरकुल प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक तथा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तत्कालीन राज्य सचिव, माजी आमदार नरसय्या आडम यांच्या विरोधात माकपने निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर पाच वर्षांनी या घरकुलांचा ताबा लाभार्थी कामगारांना देण्यासाठी पंतप्रधान मोदी पुन्हा येत आहेत. या कार्यक्रमात आडम हे मोदी यांचे स्वागत आणि कौतुक कसे करतात आणि त्यावर माकपचे केंद्रीय नेतृत्व किती गांभीर्याने भूमिका घेतात, याविषयी डाव्या वर्तुळासह सार्वत्रिक उत्सुकता असताना त्याचे उत्तर स्वतः आडम यांनी आज दिले आहे.

सोलापूरजवळ कुंभारी येथे रे नगर योजनेच्या माध्यमातून नरसय्या आडम यांच्या पुढाकाराने उभारलेल्या  कामगारांच्या पथदर्शी गृहप्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. १५ हजार घरांचा ताबा देण्यासाठी पंतप्रधान मोदी हे पुन्हा येत आहेत. त्या अनुषंगाने प्रकल्पाच मुख्य प्रवर्तक म्हणून पंतप्रधान मोदी यांचे  स्वागत करण्यासाठी माकप नेतृत्वाकडून परवानगी मिळाल्याचे आडम यांनी सांगितले. मोदी यांच्या स्वागतासह प्रास्ताविक करण्यासाठी आपणांस पाच मिनिटांची वेळ देण्यात आली आहे. त्यात औपचारिक स्वागत आणि जास्त कौतुकापेक्षा कामगारांचे विविध प्रश्न मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>सांगली : अयोध्येतील मूर्ती प्रतिष्ठापणेच्या निमित्ताने कार्यक्रमांची रेलचेल

ते म्हणाले, ९ जानेवारी २०१९ रोजी कामगारांच्या घरांचे भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान मोदी आले होते, त्याचवेळी ८ आणि ९ जानेवारी २०२३ रोजी डाव्या संघटनांनी देशव्यापी ७२ तासांचा कामगारांचा बंद पुकारला होता. त्या आंदोलनात आपणांस सहभागी होता आले नव्हते. पंतप्रधान म्हणून मोदी यांनी पुन्हा घरांचा ताबा देण्यासाठी यावे, अशी भावना आपण त्यावेळी कामगारांच्या हितापोटी केली होती. मात्र पक्षाकडून निलंबनाच्या कारवाईला आपणांस सामोरे जावे लागले होते. आता मात्र तसे घडणार नाही. आपण माकपच्या विचारांशी आजीवन निष्ठा बाळगून आहोत, असे आडम यांनी स्पष्ट केले.

Story img Loader