भाकपचे ज्येष्ठ नेते व विचारवंत कॉ. गोविंदराव पानसरे यांना गेल्या काही महिन्यांपासूनच धमक्यांची पत्रे येत असल्याची माहिती पुढे आली आहे. याची माहिती त्यांची सून मेघा पानसरे यांनी आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलताना दिली. ‘तुमचा दाभोलकर करू’ असा आशय असलेल्या या पत्रावर पुणे पोस्टाचा शिक्का असल्याचेही या वेळी त्यांनी पालकमंत्र्यांना सांगितले.
 पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी येथे पानसरे दाम्पत्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. या वेळी मेघा पानसरे यांनी वरील माहिती दिली. त्या म्हणाल्या, ही धमक्यांची पत्रे सहा-सात महिन्यांपूर्वी आली होती. त्यावर पुणे पोस्टाचा शिक्का होता. पण या पत्राची दखल पानसरे यांनी घेतली नाही. पोलिसांनी या सर्व शक्यता गृहीत धरून हल्ल्याचा तपास करावा अशी मागणी त्यांनी या वेळी केली. या वेळी पालकमंत्री म्हणाले, की पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखाली या हल्ल्याचा तपास गतीने सुरू आहे. पोलीस घटनांचा मागोवा घेत असून काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे.

पानसरेंची प्रकृती धोक्याच्या बाहेर असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत. प्रसंगी मुंबई अथवा पुणे या ठिकाणी हलविण्याची आवश्यकता निर्माण झाल्यास शासनातर्फे ‘एअर अ‍ॅम्ब्युलन्स’ची तयारीही ठेवण्यात आली असल्याची माहिती पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पानसरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, त्यांच्या शरीरातील तीन गोळय़ा बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

Story img Loader