गेल्या तीन दिवसापासून सेलू येथे सुरू असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या २४ व्या राज्य अधिवेशनाचा समारोप शनिवारी (दि.१) पार पडला. या अधिवेशनात पक्षाच्या राज्यसचिवपदी कॉ. अजीत नवले यांची निवड करण्यात आली आहे.
सेलू येथे गुरुवारपासून माकपचे राज्य अधिवेशन सुरू होते. माकपच्या पॉलिट ब्युरोचे केंद्रीय समन्वयक कॉ. प्रकाश कारत यांनी अधिवेशनाचे उद्घाटन केले. दुसऱ्या दिवशी माकपच्या अधिवेशनाला पाठिंबा देण्यासाठी समविचारी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील, लाल निशाण पक्षाचे भीमराव बनसोड, भाकपचे राज्य सचिव राम बाहेती, अजीत पाटील, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस किशोर ढमाले आदींचा यात समावेश होता.
भाकपचे राम बाहेती म्हणाले, जातीय व धर्मांध शक्तींनी सर्वत्र उच्छाद मांडला आहे. ज्या महाराष्ट्रात महापुरुषांच्या नावाचा जयघोष होतो त्याच महाराष्ट्रात महापुरुषांची बदनामी केली जात आहे. त्याचवेळी गरीब, कष्टकरी, अल्पसंख्याकांवरील अन्याय वाढत चालला आहे. एकीकडे धर्मांध शक्तीचे आव्हान आणि दुसरीकडे कार्पोरेट भांडवलशाहीचे आव्हान अशी सध्याची दोन संकटे आहेत असे बाहेती म्हणाले. समर्थ राजकीय पर्याय निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व डाव्या पक्षांनी आपली भक्कम एकजूट केली पाहिजे अशी अपेक्षा यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी झालेल्या बैठकीत ५० सदस्यांची राज्य कार्यकारिणी निवडण्यात आली. पक्षाच्या राज्य सचिवपदी अजीत नवले यांची निवड झाली. निवडीनंतर पॉलिट ब्युरोचे सदस्य डॉ. अशोक ढवळे व अजीत नवले यांनी पत्रकार बैठक घेऊन पक्षाची पुढील दिशा स्पष्ट केली. नवले हे आतापर्यंतचे सर्वात तरुण राज्यसचिव असल्याचे यावेळी अशोक ढवळे म्हणाले. १९९७ साली मराठवाड्यात माकपचे अधिवेशन झाले होते. त्यानंतर तब्बल २६ वर्षांनी मराठवाड्यात पुन्हा हे अधिवेशन झाल्याची माहिती त्यांनी दिली. देशपातळीवर सर्व समविचारी पक्षांना सोबत घेऊन केंद्रातल्या भाजप सरकार व संघ परिवाराशी लढणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे यावेळी ढवळे म्हणाले. सेलूसारख्या छोट्या गावात अत्यंत यशस्वीपणे अधिवेशन भरवल्याबद्दल त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले.
राज्यात सामाजिक ऐक्याला घातक असे राजकारण सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून होत असल्याचा आरोप नवले यांनी केला. परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड झाल्यानंतर रस्त्यावर उतरलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला तसेच शेजारच्या बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांची अमानुष हत्या करण्यात आली. अशा घटनांच्या माध्यमातून राज्यकर्त्यांचा जातीयवादी व धर्मांध दृष्टीकोन दिसून येत आहे. राजकीय स्वार्थासाठी सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रात सामाजिक ऐक्य बिघडविण्याचे काम केले आहे. हा एकोपा कायम राखणे हे राज्यात पक्षासमोरील महत्त्वाचे आव्हान असल्याचे नवले म्हणाले.